सहकारातून आरोग्यसेवेचे कार्य दीपस्तंभ ठरावे – राम नाईक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/ram-nai.jpg)
मुंबई : सहकारातून जनसामान्यांना आरोग्यसेवा देणाऱ्या शुश्रुषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभ ठरावे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. विक्रोळी येथील शुश्रुषा को-ऑप. हॉस्पिटलच्या सुमन रमेश तुलसियानी या दीडशे खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राज्यपाल नाईक बोलत होते.
नाईक म्हणाले, महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर जगात हा प्रकल्प एकमेव आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने सर्वच क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. शुश्रूषाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातही असा दबदबा निर्माण करण्याचे काम या रुग्णालयाच्या प्रकल्पातून घडत आहे. त्याकाळी डॉ. वसंत रणदिवे यांनी वैद्यकीय क्षेत्रासाठी सहकाराचा विचार न करता तो कृतीतही उतरविला आहे. सहकाराच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात आली सेवा देणाऱ्या या मंडळींचे कार्य अभिनंदनास्पद आहे. हे रुग्णालय वैद्यकीय सेवेसाठी मुंबईतील आणखी एक आपलंसं नाव ठरेल. या रुग्णालयाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील गरजूंना सेवा मिळेल. त्यामुळे हा देशातील हा सहकारातील प्रकल्प आरोग्य सेवेच्या माध्यमातून दीपस्तंभ ठरेल.