मावळ लोकसभेसाठी दुपारी एकपर्यंत 31.85 टक्के मतदान
- उनाचा पारा वाडल्याने मतदारांनी फिरवली पाठ
- दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात सकाळच्या सत्रात म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत 31.85 टक्के मतदान झाले आहे. दुपारी तापमानाचा पारा उंचवल्याने मतदारांचा प्रतिसाद कमी जाणवू लागला.
मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना आज मतदान होत आहे. सकाळी उन्हाची तिव्रता वाढण्यापूर्वीच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. दुपारी बारापर्यंत मतदानाचा टक्का वधारत गेला. दुपारी एक वाजेपर्यंत 31.85 टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर उनाचा पारा वाढू लागल्याने मतदारांनी थोडी विश्रांती घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दुपारी चारनंतर मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतील, असा अंदाज बांधला जात आहे. सुमारे ६० टक्क्यापर्यंत मतदानाची नोंद होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मतदानाची टक्केवारी
पनवेल – ३१.०९%
कर्जत – ३२.०८%
उरण – ३१.०४%
मावळ – २३.६८%
चिंचवड – ३४.१६%
पिंपरी – ३१.०१%
मावळ मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार १३३ मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ११ लाख ६५ हजार ७८८ एवढी आहे. तर, महिला मतदारांची संख्या १० लाख ६१ हजार ३१३ एवढी आहे. इतर मतदार ३२ आहेत. एकूण २ हजार ५०४ मतदान केंद्रे आहेत. २ हजार ५०४ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. १२ हजार ६५९ कर्मचारी काम करत आहेत. संपूर्ण मावळ मतदार संघात 83 मतदान केंद्रे अतिसंवेदनशिल घोषीत केली आहेत.