राज्यभर होरपळ; आणखी दोन दिवस उष्णतेची लाट
![Know today's minimum temperature of Central Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/temperature-mapping-centre-at-Bhira-in-Raigad.jpg)
कमाल तापमानाचा उच्चांक, उष्णतेची लाट आणखी दोन दिवस
राज्यात सर्वच ठिकाणी सध्या सूर्य अक्षरश: आग ओकत असून, राज्य होरपळून निघत आहे. कमाल तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असून, उन्हाचे चटके आणि घामाघूम करणाऱ्या उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे. प्रामुख्याने विदर्भातील तापमान देशातील सर्वोच्च तापमान ठरते आहे. आणखी दोन ते तीन दिवस तापमानवाढ आणि उष्णतेची लाट काय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ामध्ये पावसाळी स्थितीनंतर राज्यात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीच्या आत आला होता. मात्र, चवथ्या आठवडय़ात तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. २२ ते २३ एप्रिलला कोकण विभाग वगळता बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून दिवसाचे तापमान झपाटय़ाने वाढत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४१ ते ४६ अंशांवर गेला आहे. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ३ ते ५ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे या भागात उष्णतेची लाट आहे.
विदर्भात कोणत्याही ठिकाणी सध्या ४३ अंश सेल्सिअसच्या आत तापमानाचा पारा नाही. अकोल्यासह अमरावती, ब्रम्हपुरी, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आदी ठिकाणी तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशांवर गेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अंग भाजून काढणारे ऊन आहे. मराठवाडय़ातही कमाल तापमान ४३ ते ४४ अंशांवर आहे. मध्य मध्य महाराष्ट्रात नगर, जळगावचा पारा ४५ अंशांपुढे, तर पुण्यातही ४२.९ अंश मागील दशकभरातील उच्चांकी तापमान नोंदविले गेले. कोकण विभागात मुंबईत ३४.५, तर सांताक्रुज येथे ३५.८ अंश कमाल तापमान नोंदविले गेले. सरासरीच्या तुलनेत हे तापमान अधिक असल्याने या भागातही उकाडा वाढला आहे. राज्यात कमाल तापमानासह किमान तापमानतही वाढ होत असल्याने रात्रीच्या उकाडय़ात कमालीची वाढ झाली आहे. कोरडय़ा हवामानाची स्थिी असेपर्यंत तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात पावसाळी स्थिती निर्माण होऊ शकते.
कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ४२.९, नगर ४२.५, जळगाव ५४.०, कोल्हापूर ३९.९, मालेगाव ४४.६, सोलापूर ४३.१,मुंबई ३४.०, सांताक्रुझ ३५.८, रत्नागिरी ३२.६. औरंगाबाद ४३.६, उस्मानाबाद ४३.६, अमरावती ४६.०, बुलडाणा ४३.३, ब्हम्हपुरी ४६.४, चंद्रपूर ४६.५, गोंदिया ४३.०, नागपूर ४५.३, वर्धा ४६.०, वाशीम ४४.६. अकोला ४६.७, यवतमाळ ४५.२.
यंदाही सर्वाधिक उष्णवर्ष?
गेल्या शतकातील भारतीय हवामान खात्याच्या नोंदीनुसार, १८९२, १९७३, १९८९, १९९६, २००५ आणि २००७ ही वर्षे सर्वाधिक उष्णतेच्या लहरीची वर्षे ठरली आहेत. मात्र, या उष्णतेच्या लहरी मे महिन्याच्या अखेरीच्या काळातील आहेत. यावर्षीचा तापमानाचा अंदाज पाहता हे वर्षदेखील या यादीत जोडले जाण्याची शक्यता आहे. प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ हे घटक वाढत्या तापमानाला कारणीभूत असले तरीही गुजरात, राजस्थानमधून येणारे उष्ण वारेदेखील तितकेच कारणीभूत ठरत आहेत.
तापभान.. : सध्या मध्य प्रदेश ते कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थान परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचा परिणाम देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हवामानावर झाला आहे. राज्यात कोरडे हवामान असल्याने तापमानात झपाटय़ाने वाढ होत आहे. शनिवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागासह विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आहे. त्याचा परिणाम म्हणून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची आहे. त्यामुळे कोकण विभागातील हवाही आता तापू लागली आहे.