काँग्रेसकडून मतांसाठी हिंदू दहशतवादाचा सिद्धांत – जेटली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Untitled-10-28.jpg)
काँग्रेसने मतांसाठी हिंदू दहशतवादाचा सिद्धांत रचल्याचा आरोप करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मतांसाठी काँग्रेसने इतकी वर्षे समझोता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण रखडत ठेवले, असेही जेटली यांनी म्हटले आहे. पंचकुला न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची अलीकडेच निर्दोष मुक्तता केल्यानंतर जेटली यांनी हे वक्तव्य केले आहे.
या प्रकरणाचा सर्व तपास २००७-०९ दरम्यान झाला आहे. आरोपींना १० वर्षे कारागृहामध्ये ठेवण्यात आले, आरोपपत्र दाखल करण्यात आले, परंतु कोणताही पुरावा नसल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. कोणताही पुरावा हाती नसताना हिंदू समाजाची बदनामी करण्यासाठी हिंदू दहशतवादाचा कट रचण्यात आला, चुकीच्या लोकांना पकडण्यात आले, असे जेटली म्हणाले.
काँग्रेसने हिंदू दहशतवादाचा सिद्धान्त रचून खोटय़ा पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल केले, निर्णय अखेर न्यायालयच घेते, त्यामुळेच कदाचित ज्यांनी हिंदूंना दहशतवादी ठरविले ते आज धर्माप्रति आपली श्रद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला जेटली यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांना लगावला.