गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत?
- दोन जणांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार
पणजी – प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री पदावर दोघांची वर्णी लागणार आहे. सुदीन ढवळीकर आणि विजय सरदसाई हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. आज रात्रीच हे सर्व नेते शपथ घेणार आहेत.
सुदीन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तर सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते आहेत. प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती आहेत. उत्तर गोव्यातल्या सॅनक्वलिम या विधानसभेच्या जागेवरून ते जिंकून आले आहेत.
गेल्या 24 तासांपासून मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. मात्र त्यावर तोडगा निघत नव्हता. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यरात्रीच पणजीत दाखल झाले होते. मात्र नावावर एकमत होत नव्हते. भाजपला पाठिंबा देणारे मित्रपक्ष राजी होत नसल्याने पेच वाढला होता.
प्रमोद सावंत हे मनोहर पर्रिकरांचे विश्वासू असल्याने त्यांचं नाव आघाडीवर होतं. तर भाजपची ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनेही सस्ता स्थापनचा दावा केला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हेही गोव्यात अंत्यसंस्कारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर हालचाली वाढल्या.
एकूण जागा : 40
सध्याचे संख्याबळ – 36
भाजप : 12
मगोप – 3
गोवा फॉरवर्ड – 3
अपक्ष – 3
काँग्रेस आघाडी
काँग्रेस : 14
राष्ट्रवादी काँग्रेस- 1