राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे समर्थकांचा एल्गार… ‘उपरा’ उमेदवार आम्हाला चालणार नाही!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Lande-Kolhe.jpg)
– शिरुर लोकसभा निवडणुकीत बंडाची शक्यता वाढली
– पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
(विशेष प्रतिनिधी)
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरुन पक्षाचे नेते आणि पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर राजकारणी विलास लांडे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींविरोधात एल्गार केला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात ‘उपरा’ उमेदवाराचे काम करणार नाही, असा इशारा देत बंडखोरीची भूमिका घेतली जात आहे. तशा ‘पोस्ट’ सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत.
शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असलेले विलास लांडे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू केला आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, मंचर आणि हडपसर विधानसभा मतदार संघात भेटी-गाठी वाढवल्या आहेत. अशातच ‘धर्मवीर संभाजी’ मालिका फेम डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. एव्हढेच नाही तर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे वातावरणही निर्माण केले. त्यामुळे अगदी आचारसंहिता लागल्यावर विलास लांडे यांचे नाव मागे पडले आहे. त्यातच पक्षाचे ‘कारभारी’ असलेल्या अजित पवार यांनी जाहीर मेळाव्यात उमेदवारीबाबत जनमत घेतले. त्यामध्ये डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेतली. हे लक्षात येताच विलास लांडे यांच्या उमेदवारीचे मार्ग जवळपास बंद झाले. परिणामी, लांडे समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सोशल मीडियावर थेट आव्हान दिले जात आहे. एकवेळ शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम करु…पण राष्ट्रवादीतून ‘उपरा’ अर्थात डॉ. कोल्हे यांना मदत करणार नाही, अशी भूमिका जाहीरपणे घेतली जात आहे. त्यामुळे शिरुरच्या आखाड्यात राष्ट्रवादीत बंडखोरी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
***
विलास लांडे यांचा राजकीय ‘अभिमन्यू’ झालाय?
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘चाणक्य’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ नेते विलास लांडे यांना २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून सूर गवसलेला दिसत नाही. त्यापूर्वी शिरुर लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या तीन-चार महिन्यांपासून शिरुरच्या मैदानात उतरण्यासाठी लांडे यांनी जोरदार तयारी केली होती. त्याला राजकीय परिस्थितीही कारणीभूत आहे. भोसरीत विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार महेश लांडगे आणि लांडे एकमेकांविरोधात आल्यास दोघांपैकी एकाचा पराभव अटळ आहे. त्यातच भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे पर्याय बंद झाले आहेत. भाजपकडून लांडगे यांचे विधानसभा तिकीट ‘फिक्स’ आहे. त्यामुळे नात्याने मामा-भाचे असलेल्या लांडे-लांडगे या दिग्गजांनी लोकसभा-विधानसभा विभागणी करावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. राष्ट्रवादीकडून लांडे यांना लोकसभा तिकीट मिळाल्यास लांडगे युतीधर्मापेक्षा मामाधर्म पाळतील, असा अनेकांचा कयास होता. मात्र, राष्ट्रवादीकडून तिकीट कापल्यामुळे लांडेंना विधानसभा निवडणुकीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य कोणत्या पक्षाचे किंवा आघाडीचे तिकीट लांडे घेणार नाहीत, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकसभेसाठी तिकीट मिळवणे किंवा विधानसभा महेश लांडगेंविरोधात लढणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मातब्बर असलेले लांडे यांचा राजकीय अभिमन्यू झाला आहे का? अशी चर्चा त्यांच्या विरोधकांमधून होताना दिसत आहे. असे असले तरी राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठी लांडे यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत ‘शब्द’ देतील, असेही बोलले जात आहे. वास्तविक, राजकारणात ‘चाणक्य’ असलेले विलास लांडे यांचा अंदाज लावणे वाटते तितके सोपे नाही, ही बाब दुर्लक्षित करुन चालणार नाही, असेही जाणकार सांगत आहेत.