विठ्ठल मंदिरातील महिला भाविकांना मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/4pandharpur_43.jpg)
पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी महिला भाविकांशी झोंबाझोबी करत मारहाण केली. देवाच्या दारातच महिला भाविकांवर रक्षकांनीच हात उचल्याने वारकरी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान याप्रकरणाची चौकशी करुन संबंधीत सुरक्षा रक्षकांवर कारवाई केली जाईल असे प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
नाशिक व भिवंडी येथील सोनवणे कुुटुंबिय काल (ता. 8) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले होते. विठ्ठलाच्या पददर्शन रांगेतून जाताना देवाच्या जवळ आल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकाने महिलांना विजया सोनवणे आणि प्रियंका येवलेकर यांना ढकला ढकली केली. यावरुन देवाच्या समोरच महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये महिलेच्या मुलाला देखील सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान मंदिरातील उपस्थित काही पोलिस कर्मचाऱ्यांनी ही महिला भाविकांना दमदाटी केली.
हा सारा प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र मारहाणीचे चित्रीकरण देण्यास मंदिर समितीकडून टाळाटाळ केली जात आहे. झाल्या प्रकाराची तक्रार देण्यास गेल्यानंतर मात्र मंदिर समितीच्या सदस्यांनीच मध्यस्थी करुन हे प्रकरण पोलिस ठाण्याच्या बाहेरच मिटवण्याचा प्रयत्न केला. भाविकांनी तक्रार दिली नसली तरी मंदिरातील पोलिसांनी तक्रार देणे क्रमप्राप्त असतानाही रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र महिलांचा सन्मान केला जात असतानाच पंढरीत मात्र देवाच्या समोरच महिलांना मारहाण केल्याने महिला भाविकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकारामुळे पंढरीत महिला दिनाला गालबोट लागले.
मंदिरात महिला भाविकांसोबत घडलेला प्रकार निंदनीय आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी करुन संबंधीत सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई केली जाईल.
– सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर