काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/ajit-sawant.gif)
मुंबई – काँग्रेसचे माजी नेते व राजकीय भाष्यकार अजित सावंत यांचे गुरूवारी सायंकाळी निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्कमधील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंकस्कार करण्यात येणार आहेत.
अजित सावंत हे गेल्या दोन वर्षापासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर गुरूवारी सायंकाळी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. अजित सावंत हे पक्के काँग्रेसी होते. मात्र, स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना पक्षातून बाजूला केले गेले. त्यामुळे मधल्या काळात ते आम आदमी पक्षात गेले. मात्र, तेथेही ते फार रमले नाहीत.
सावंत यांनी कामगार, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्यभर काम केले. कामकारांचे हक्क, कामगार कायदे यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी त्यांनी पहिली संघटना स्थापन केली. भांडवलशाहीत कामगार, कर्मचारी यांची पिळवणूक कशी होते यावर त्यांनी नेहमीच आवाज उठवला.
अजित सावंत यांच्या अकाली निधनामुळे एक सुन्नपणा आला आहे. एक उमदा, प्रसन्न आणि हाकेला धावून येणारा माणूस. उत्साहाचा अखंड झरा, माणुसकी जपणारा, कलाप्रेमी आणि हळवादेखील. काँग्रेससाठी सतत झिजलेला नि लाठ्याही खाल्लेला. अजितने कामगारांसाठीही चळवळी केल्या, त्यांची संघटना बांधली, त्यांच्या प्रश्नांबाबत लेख लिहिले आणि आपल्या साम्यवादी पित्याचा वारसा चालवला.
अजितने काँग्रेससाठी रक्त आटवले, पण पक्षाने त्याच्यावर मात्र शेवटी अन्यायच केला. गेली काही वर्षे तो काँग्रेसमध्ये नव्हता. पण त्याच्या नसानसात मात्र गांधी-नेहरूंच्या काँग्रेसचा विचार भिनलेला होता. अजितसारख्या सच्च्या व समर्पित कार्यकर्त्याचा काँग्रेसने नीट उपयोग करून घ्यायला हवा होता. आज देशातील वाढत्या धर्मांध आणि फॅसिस्ट विचारसरणीचा मुकाबला करण्यासाठी अजित सावंतसारख्या लढाऊ माणसाची गरज होती. त्याच्या निधनामुळे मी एक मित्र गमावला आहे, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी अजित सावंत यांना आदरांजली अर्पण केली.