दहशतवादी हल्ला पुन्हा झाल्यास भारतासमोर सर्व पर्याय खुले

अधिकाऱ्यांचा इशारा
देशावर आणखी दहशतवादी हल्ला झाल्यास भारताकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत, असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. पाकिस्तानमधील दहशतवादाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानने ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी भारत सरकार आग्रही आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्यासाठी एफ-१६ लढाऊ विमानांचा वापर केल्याचे पुरावे भारताने अमेरिकेला दिले आहेत आणि अमेरिका त्याबाबत चौकशी करीत आहे याचा विश्वास आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाच्या प्रश्नावरून भारत पाकिस्तानवर अधिकाधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्ताननेही मदतीसाठी धावाधाव सुरू केली आहे, मात्र भारताची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध होत आहे. हा भारत आणि पाकिस्तानमधील प्रश्न नाही तर दहशतवादाचा प्रश्न आहे, असे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याच्यावर बंदी घातली तर पाकिस्तान अधिकच अडचणीत येईल. कारण मसूद पाकिस्तानात असल्याचे वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे.
भारताने जैशच्या अड्डय़ांवर हल्ला केल्यानंतर पश्चिम क्षेत्रातील हवाई दलाच्या सर्व तळांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.





