पाकिस्तानात संघटित दहशतवादी संघटनांचे अस्तित्व नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/pakistan-1.jpg)
पाकचे अमेरिकेतील राजदूत असाद माजिद खान यांचे वक्तव्य
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने न्यायाधीश, पंच, शिक्षेची अंमलबजावणी करणारा देश अशा सर्व भूमिका पार पाडल्या असून, आमच्या देशात कुठल्याही संघटित दहशतवादी संघटनांचे अस्तित्व नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेला हल्ला, त्यानंतर भारताने केलेले हवाई हल्ले (२६ फेब्रुवारी) त्याला पाकिस्तानने दिलेले प्रत्युत्तर (२७ फेब्रुवारी) या घटनाक्रमांत भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून, त्या बाबत पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असाद माजिद खान यांनी सांगितले, की भारताने यात न्यायाधीश, पंच, शिक्षेची अंमलबजावणी या सगळय़ा भूमिका पार पाडल्या. पाकिस्तानातील दहशतवादी गटाने पुलवामाचा हल्ला केला असा हास्यास्पद दावा करीत भारताने आमच्या देशातील दहशतवादी छावणीवर हल्ला करून त्यात ३०० दहशतवादी मारल्याचे स्पष्ट केले. पण तटस्थ निरीक्षकांनी भारताचे हे दावे फेटाळले असून, भारतातील अनेक घटकांनीही या दाव्यातील फोलपणा उघड केला आहे.
अमेरिका व इतर देशांनी पाकिस्तानला दहशतवादी गटांच्या मुसक्या आवळण्यास सांगितले असताना खान यांनी हे स्पष्टीकरण केले असून, ते म्हणाले, की दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत, पण ते सध्या तरी एका टोकाला जाऊन मागे फिरले आहेत. परिस्थिती गंभीर आहे.
यूएस इन्स्टिटय़ूट ऑफ पीस या संस्थेत त्यांनी सांगितले, की भारताचा वैमानिक अभिनंदन याची सुटका केल्यानंतर प्रत्यक्ष ताबारेषेवरचा तणाव थोडा कमी झाला.
पाकिस्तानात कुठलेही संघटित दहशतवादी गट अस्तित्वात नाहीत, असा दावा खान यांनी केला. सध्याच्या परिस्थितीस भारतच जबाबदार आहे, कारण बदमाश घटकांच्या कारवायांमुळे अशा प्रकारचा दहशतवाद फोफावतो. असे सांगून ते म्हणाले, की जर असे झाले तर आम्ही तसे करू अशी भूमिका घेताना एक, दोन किंवा काही व्यक्ती (बदमाश घटक) परिस्थितीला ओलिस ठेवत असतात. त्यातून युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते. पुलवामा घटनेनंतर भारताने वादग्रस्त दावे केले. त्यांच्याकडे पुरावे होते, तर त्यांनी सादर करायला हवे होते. नंतर भारतीय माध्यमांनी पाकिस्तानविरोधात युद्धज्वर निर्माण केला. भारताने पुराव्यांकडे लक्ष दिले नाही, पुलवामाचा हल्ला तेथील लोकांनीच केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी गट असतील तर त्याचे पुरावे दिल्यास कारवाई करण्याचे आश्वासन भारताला दिले होते.
२७ फेब्रुवारीला पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल काश्मीरमध्ये जो हल्ला केला होता त्यात सहा पट आत जाऊन नागरी हानी टाळून हल्ले करण्यात आले.
जेव्हा भारताच्या दोन विमानांनी आमची हद्द ओलांडली तेव्हा ती पाडण्यात आली. आम्हाला आमच्या संरक्षणाचा अधिकार आहे हेच त्यातून दाखवायचे होते. यातून पेच पुढे चिघळवण्याची पाकिस्तानची इच्छा नाही व संवादाची तयारी आहे हेही पाकिस्तानने लोकशाही व जबाबदार देश म्हणून स्पष्ट केले होते, असे खान यांनी स्पष्ट केले.