विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यकथा आता पाठ्यपुस्तकात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/VarthMan-1.jpg)
भारतीय हवाईदलाचा धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे आजवर अनेकांनी कौतुक केले आणि अजूनही करीतच आहेत. दरम्यान, त्यांची शौर्यकथा आता शाळांमधील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा यांनी सोमवारी ट्विट करुन याची माहिती दिली. अभिनंदन यांचा सन्मान करण्यासाठी राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारेही दिली आहे. यासाठी त्यांनी अभिनंदनदिवस असा हॅशटॅगही वापरला आहे.
भारतीय हवाई हद्दीत बेकायदा घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना पळवून लावताना विंग कमांडर यांचे मिग २१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. त्यानंतर त्यांनी तब्बल ६० तास पाकिस्तानातच्या ताब्यात घालवले. त्यानंतर ते तीन दिवसांपूर्वी भारतात होते.
दोतसरा यांनी ही घोषणा केली असली तरी हा धडा नेमका कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. त्याचबरोबर पुलवामातील शहीदांची कथाही या धड्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीने हा प्रस्ताव स्विकारला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी मागील वसुंधराराजे सरकारवर टीका करताना त्यांनी शिक्षणात राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच सरकारने पाठ्यपुस्तकात इतिहास, संस्कृती आणि थोर व्यक्तींना शालेय पुस्तकांमध्ये स्थान दिले नाही, असे ते म्हणाले.
राजस्थानच्या शिक्षण विभागाने नुकतेच सरकारी संरक्षण अॅकॅडमीचे उद्घाटन केले. सिकर येथे ही अॅकॅडमी उभारण्यात आली असून त्यासाठी ३१.५ कोटी रुपये खर्च आला आहे. याचे ‘महाराव शेखाजी सशस्त्र बल प्रशिक्षण अॅकॅडमी’ असे नामकरण करण्यात आले आहे. ही अॅकॅडमी तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करणार असल्याचे दोतसरा यांनी सांगितले.