वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम बंद होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/doctor.jpg)
पदवी अभ्यासक्रमांत रुपांतर, जागा वाढणार
वैद्यकीय पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाचे येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१९-२०) पदव्युत्तर पदवी (एमडी, एमएस) अभ्यासक्रमात रुपांतर करण्यात येणार असून त्यामुळे एमडी, एमएस च्या २७५ जागा वाढणार आहेत.
भारतील वैद्यक परिषदेने वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम आहेत, त्यांचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. यापूर्वीच परिषदेने हा निर्णय घेतला होता.
यंदा या पदविका ते पदवी असे रुपांतर करण्यासाठीचे शेवटचे वर्ष असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार अर्जाला मंजुरी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. राज्यात सध्या १६ महाविद्यालयांमध्ये पदविका अभ्यासक्रम चालतात, तेथे पदवीच्या २७२ जागा वाढणार आहेत. देशभरात अशा २ हजार १२० जागा वाढणार आहेत. सध्या शासनाचे गॅ्रँट मेडिकल महाविद्यालय, सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांना अभ्यासक्रमाचे रुपांतर करण्यास परवानगी मिळाली असून शासनाच्या इतर चार महाविद्यालयांनीही अर्ज केले आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.