breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

झोपडीवासीयांना ५०० चौरस फुटांचे घर अशक्य!

राहुल गांधी यांच्या घोषणेवर प्राधिकरणाचे स्पष्टीकरण

निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे मुंबईत आलेले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी झोपडीवासीयांना ५०० चौरस फुटांचे घर देऊ, असे आश्वासन दिले असले तरी ते प्रत्यक्षात शक्य नसल्याचे झोपु प्राधिकरणातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. घरांचा आकार बदलत राहण्याच्या आमीषामुळे या योजनेलाच धक्का बसू शकतो, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

राज्यातील भाजप सरकारने २००० ते २०११ पर्यंतच्या झोपडीवासीयांना सशुल्क घरे देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे झोपडीवासीयांची संख्या आणखी वाढली आहे. त्यातच २६९ चौरस फुटांवरून आता ३०४ चौरस फुटांचे घर या झोपडीवासीयांना देण्यात येणार आहे. त्यामुळे सादर झालेल्या प्रस्तावात तशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. अशा वेळी ५०० चौरस फुटांच्या घराची घोषणा केली गेली तर झोपु योजनेसाठी सादर करण्याच्या प्रस्तावांमध्ये घट होईल. झोपु योजनांमध्ये विकासकाला पुनर्वसनासाठी जेवढे चटई क्षेत्रफळ लागते त्या तुलनेत त्याला प्रोत्साहनात्मक म्हणून दिले जाते. ५०० चौरस फुटांचे घर दिल्यास प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ आणि भूखंडावर लागू असलेल्या चार इतक्या चटई क्षेत्रफळाचा विचार केल्यास योजनाच अव्यवहार्य ठरू शकते, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. नव्या विकास नियमावलीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासाठी ३०४ चौरस फुटांचे घर निश्चित करण्यात आले आहे. अनेक योजना यानुसारच आता सादर होत आहेत. अशा वेळी या नव्या घोषणेमुळे झोपडीवासीय बिथरतील आणि झोपु योजनांना खीळ बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. झोपडीवासीयांना सुरुवातीला २२५ आणि नंतर २६९ चौरस फुटांचे घर देण्यात आले. आता ३०४ चौरस फुटांचे घर देण्यात येणार आहे. झोपडीवासीयांनाही फंजीबल चटई क्षेत्रफळाचा लाभ देता येईल का, याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास झोपडीवासीयांना ४०५ चौरस फुटांपर्यंत घर मिळू शकते, याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button