‘नगरसेवकांना चोपून काढा’, म्हणणा-या कर्मचा-यावरुन सत्ताधारी-विरोधी नगरसेवकांत फूट
- भाजप नगरसेवकांकडून कर्मचा-याच्या कारवाईस सारवासारव
- विरोधक नगरसेवकांकडून निलंबनासह गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंत्यास नगरसेवकांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कर्मचारी महासंघाच्या व्दार सभेत घेतली. त्या सभेत नगररचना विभागातील टंकलेखन पदावर कार्यरत असलेल्या कर्मचा-याने ‘नगरसेवकांना चोपून काढा आणि रागाच्या भरात असं झालं म्हणून सांगा’ असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरुन आज (शुक्रवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी संबंधित कर्मचा-यांच्या निलंबन करुन गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. तर सत्ताधारी भाजपकडून त्या कर्मचा-याच्या कारवाईसाठी सारवासारव भूमिका घेत निलंबन नको, माफी मागून सक्त ताकीद देण्यात यावी, अशी भूमिका घेतली. त्या कर्मचा-यांवरील कारवाईवरुन सत्ताधारी आणि भाजप नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर राहूल जाधव होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, नगरसेवकांना चोपून काढा, असं म्हणणारा हा कर्मचारी नेमका आहे तरी कोण? असा सवाल करीत यापुढे आम्हा नगरसेवकांना सुरक्षाकवच घालून यावे लागेल, या मस्तवाल कर्मचा-यावर निलंबनाची कारवाई करुन गुन्हा दाखल करा, यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून प्रकरणाची सत्यता तपासून घेण्याचीही मागणी केली.
भाजप नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, महापालिकेत आम्ही लोकांची काम करायला आलोय, आमच्या आई-बापाने इथं मार खायला पाठविले नाही. त्या कर्मचा-याने जाहीर माफी मागून त्याचे निलंबन करावे, तर मनसेचे सचिन चिखले यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकमेकांच्या समन्वयाने काम करायला हवे, असं सांगितले. नगरसेवक बापू काटे म्हणाले की, संबंधित कर्मचा-याचे निलंबन न करता त्यांनी संपुर्ण सभागृहाची माफी मागावी, असं सांगितले. तर अजित गव्हाणे यांनीही लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचा-यांनी योग्य तो संवाद साधून कामकाज करावे, नगरसेवकांना सन्मान द्या, असं सांगितले.
तसेच नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले की, आम्ही 22 लाख नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतो, आम्ही चुकीचे कामे सांगत नाही, तुम्ही नगरसेवकांशी जबाबदारीने वागत नाही. लोकप्रतिनिधींशी तुम्ही मस्तीत वागता, त्याचा सन्मान करीत नाही, आमच्याकडेही चुकीला माफी नाही. आम्ही निवडणूक सोडून कधीही वेळेला एकत्रित येतो. सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी नीट वाघायचे, तुम्ही पालिकेचा पगार घेता, लोकाची कामे करायला, आमच्यावर तुम्ही उपकार करत नाही. त्यामुळे महापालिका अजून प्रायव्हेट लिमिटेडं कंपनी झालेली नाही, हे लक्षात ठेवून वागायला शिका, असा सज्जड दम त्यांनी भरला.
दरम्यान, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणालेे की, अनेक नगरसेवकांच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत. त्यामुळे काही अधिकारी व कर्मचा-यांनी भान ठेवून बोलावे, सदरील घटनेची सत्यता तपासून चाैकशीही झालीच पाहिजे. परंतू, अधिका-यांनी नगरसेवकांच्या भावन समजून घेतल्या पाहिजे. त्यांनी सर्वांशी सन्मानाने वागले पाहिजे. त्यामुळे त्या कर्मचा-यांना वरिष्ठांनी समक्ष बोलवून योग्य ती सक्त ताकीद द्यावी, अशा सुचना केल्या.
महापाैर राहूल जाधव म्हणाले की, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांनी मर्यादीत राहून जबाबदारीने काम करावे, सदरील प्रकरणाची चाैकशी करुन योग्य ती ताकीद वरिष्ठांनी द्यावे, अशा सुचना दिल्या.