‘आला रे आला, १५ लाखांचा चेक आला, संसदेबाहेर चेक वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/modi-15lc2_201902195022.jpg)
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणा विरोधी पक्ष आणि सर्वसामान्यांकडून सातत्याने होत असते. त्यावरून मोदी आणि भाजपावर टीकाही केली जाते. मात्र आज संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवन परिसरात कुठलाही गाजावाजा न करता 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटप सुरू झाले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्या 15 लाख रुपयांच्या चेकमागचे खरे कारण वेगळेच होते.
त्याचे झाले असेकी, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरात विरोध प्रदर्शन करून निषेध नोंदवला. त्यावेळी या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेल्या 15 लाख रुपयांच्या चेकचे वाटपही केले. संसद भवन परिसरामध्ये विरोध करत असलेली मंडळी हे चेक हातात घेऊन उभी होती.
खरंतर हे चेक नकली होते. मात्र खऱ्या चेकप्रमाणे त्यांची रचना करण्यात आली होती. मात्र त्यावर कुठल्याही बँकेचे नाव न टाकता फेकू बॅक असे नाव टाकण्यात आले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि सहीसुद्धा ठेवण्यात आली होती.