भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा ठराव रद्द करा; मुख्यमंत्र्याकडे तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/डाॅकटर.jpg)
नागरी हक्क सुरक्षा समितीची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून भोसरी गावठाणात १०० खाटांचे अध्ययावत रुग्णालय बांधलेले आहे, आता हे रुग्णालय खाजगी संस्थेस चालविण्यास देण्याचे षड्यंत्र पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून केले जात आहे. याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने कुठलीही चर्चा न करता तशा स्वरूपाचा ठराव संमत करून घेण्यात आला आहे, सदर ठराव हा बेकायदा असून आपण राज्याचे प्रमुख व नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून सदर ठराव रद्द करण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना द्याव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड नागरी हक्क सुरक्षा समितीने पत्राव्दारे केली.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने हे रुग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देण्यास आमचा विरोध आहे. शहराची वाढलेली लोकसंख्या, कामगार, मध्यमवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांची संख्या पाहता या लोकांना खाजगी दवाखान्यातील महागडे वैद्यकीय उपचार परवडू शकत नाहीत. महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना इतर मुलभूत सुविधांबरोबरच वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे.
असे असतानाही सर्वसामान्य लोकांच्या करांच्या पैशांमधून बांधलेले रुग्णालय खाजगी संस्थेस चालविण्यास देणे, हा जनतेशी केलेला ‘द्रोह’ आहे.
तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीत, सदर हॉस्पिटल चालविण्यास दरवर्षी सुमारे २० कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे कारण प्रशासनाकडून व पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे, असे जर असेल तर महापालिकेच्या अनेक विकासकामांसाठी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेत लाखो रुपये वेतन घेणारे कर्मचारी व तज्ञ अभियंते उपलब्ध असतांना कोट्यावधी रुपये अदा करून सल्लागारांची नेमणूक कशासाठी केली जाते?, या कर्मचारी व अभियंत्यांना काढून सल्लागारांमार्फतच कामे करून घेतली तर महापालिकेचा अशा निर्बुद्ध कर्मचाऱ्यांवर होणारा वेतनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचणार नाही का? सबब प्रशासन देत असलेले कारण ‘तकलादू’ असून हॉस्पिटलचे खाजगीकरण करून ‘काही विशिष्ट मंडळींचा आर्थिक लाभ करून देण्यासाठीच हा सर्व ‘उपद्व्याप’ सुरु असल्याचा आमचा आरोप आहे.
महापालिका निवडणुकीच्या वेळी आपण दिलेल्या ‘भ्रष्टाचारमुक्त व भयमुक्त’ कारभाराच्या आश्वासनाला उघड उघड ‘हरताळ’ फासण्याचे काम अतिशय उत्कृष्ठपणे आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महापालिकेत करत आहेत, याचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटत असेल. सध्या महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वायसीएम हॉस्पिटल मध्ये शहरातील व शहराजवळील गावांतील हजारो रुग्णांना माफक दरात व बहुतांशी मोफत उपचार केले जातात, यामध्ये अनेक त्रुटी आहेत, परंतु हा दोष सर्वसामान्य लोकांचा नसून महापालिका प्रशासनाचा, डॉक्टरांच्या आपापसातील हेवादाव्यांचा आहे,
याबद्दल आपणास अधिक सांगण्याची गरज नाही. महापालिका दवाखान्यांसाठी तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीत हा महापालिकेचा दावा हास्यास्पद असून त्यासाठी प्रशासन कुठलेही प्रयत्न गांभीर्याने करताना दिसत नाही. ज्या तज्ञ डॉक्टर्सना महापालिका रुग्णालयात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यावर अशा जाचक अटी व निकष लादण्यात येतात की त्यांनी येथे येउच नये असे वातावरण ‘जाणीवपूर्वक’ निर्माण केले जात असल्याचे आम्हास आढळून आले आहे. मागील काळामध्ये वायसीएम चे सुद्धा खाजगीकरण करण्याचा ‘घाट’ घातला गेला होता.
परंतु आम्ही व इतर सामाजिक संघटनांनी पालिकेचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. आतासुद्धा खाजगी संस्थांचे व काही ‘प्रभावी’ राजकीय नेत्यांचे ‘आर्थिक हितसंबंध’ जपण्यासाठीच भोसरी येथे बांधण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या खाजगीकरणाचा घाट घातला जातोय असा आमचा संशय आहे. असे खाजगीकरण केल्यास सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार असून खाजगी संस्थेला वारेमाप पैसे कमवून देणारे साधन आपण निर्माण करून देणार आहात. सबब, भोसरी येथील हे हॉस्पिटल महापालिकेनेच चालवावे अशी मागणी आम्ही करत आहोत, अन्यथा शहरातील सर्व सामाजिक संघटनांना संघटीत करून आम्ही याविरुद्ध जनांदोलन करू, व त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन प्रमुख म्हणून आपण जबाबदार असाल, असा इशारा दिला आहे.