व्यापाऱ्यांनी पथारी हातगाडी धारकांना विरोध करू नये – बाबा कांबळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/IMG-20190127-WA0086.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – भारतीय राज्य घटनेेने गोरगरीब, कष्टकरी जनतेला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. पिंपरीतील पथारी हातगाडी धारकांना महापालिकेने परवाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना सन्मानाने व्यवसाय करु द्यावा, परंतु काही व्यापारी गोरगरीब पथारी धारकांना प्रतिस्पर्धी समजून त्यांच्या विरोधात तक्रार करत आहेत. पथारी हातगाडी धारक हे व्यापाऱ्यांचे प्रतिस्पर्धी नसून त्यांना पुरक आहेत. ज्या ठिकाणी पथारी हातगाडी धारक नाहीत, त्या ठिकाणच्या दुकानदाराचा व्यवसाय चालत नाही. त्यामुळे पिंपरीतील व्यापाऱ्यांनी गोरगरीब पथारी हातगाडी धारकांना विरोध करू नये असे आवाहन कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.
टपरी पथारी हातगाडी पंचायतीच्या वतीने पिंपरीतील शगुन चौक शाखा आयोजित गणराज्य दिन आणि भारतीय राज्यघटना सन्मान समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. भारतीय राज्य घटनेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन पथारी धारकांचे प्रश्न समजुन घेतले.
या कार्यक्रम प्रसंगी टपरी पथारी हातगाडी पंचायतीचे सचिव प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, रिक्षा संघटनेचे पोपट तोरमल, मुकेश जाधव, घरकाम महिला अध्यक्षा आशा कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी अमर जस्वाल, सनी वाघमारे, विशाल साबळे, कलीमुदिन शेख, बशीर कुजारा, दशरध हिगके, किरण जस्वाल, सतिश वाघमारे, अशोक पडागळे, जुम्मन शेख, मुकेश नेवानी, यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.