दुखापतीनंतर मालिश केल्याने १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू?
शाळेत खेळताना पाय घसरुन पडलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रोहित तोडासे (वय १२) असे या मुलाचे नाव असून प्राथमिक उपचारानंतर त्याला कुटुंबीयांनी पुण्यातील कर्वे रोड येथे एका व्यक्तीकडे मालिशसाठी नेले होते. मालिश केल्यानंतर त्याची प्रकृती खालावली होती.
पिंपरीत राहणाऱ्या रोहित तोडासे हा मुलगा १४ जानेवारी रोजी शाळेत बाथरुममध्ये पाय घसरुन पडला होता. त्याच्या पोटाला आणि पायाला मार लागला होता. त्याच्यावर चक्रपाणी वसाहतीत राहणाऱ्या डॉक्टरकडे प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला बिर्ला हॉस्पिटलआणि तिथून पुण्यातील कर्वे रोड येथे नेण्यात आले. कर्वे रोड येथे मालिश करणाऱ्या व्यक्तीकडे त्याला नेण्यात आले होते. मालिश केल्यानंतर रात्री उशिरा रोहितची प्रकृती खालावली आणि शनिवारी सकाळी उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला. रोहितच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.