गैरवापर वाढल्याने सभागृहातील नगरसेवकांच्या प्रश्नोत्तरांना महापाैरांचा लगाम
नगरसेवकांची प्रश्नोत्तरे अडविल्याने महापाैर राहूल जाधव यांचे स्पष्टीकरण
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ससंदीय लोकशाही पध्दतीने लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्यास दिलेले अधिकार व हक्कांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैरांनी गदा आणली आहे. महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी आपल्या प्रभागांसह शहरातील अन्य अडीअडचणी, समस्यांवर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. परंतू, तो हक्क व अधिकारांवर महापाैरांनी लगाम घातल्याचे उघडकीस घातले आहे. यावर महापाैर राहूल जाधव म्हणाले की, मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढल्याने सभागृहातील कोणत्याही नगरसेवकांचे प्रश्न सभागृहासमोर आणले नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
लोकशाही ससंदीय व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना कार्यकारी मंडळातील प्रशासनाच्या अधिका-यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लोकप्रतिनिधीं प्रश्न विचारण्याच्या अधिकारावरच गदा आणून लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटला जात आहे. शहरातील विविध प्रभागातून महानगरपालिकेत जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांना जनतेच्या न्याय व हक्कांसाठी प्रशासनाला जाब विचारणे, अडीअडचणीसह विकास कामे, धोरणांवर सभागृहात प्रश्नोत्तर माध्यमातून जाब विचारण्याचा अधिकार आहे.
महानगरपालिका अधिनियमातील अनुसूचि प्रकरण 2 मधील नियम 5 नुसार हा प्रश्नोत्तरांचा अधिकार आहे. तसेच सभागृहासाठी लेखी स्वरुपात सर्वसाधारण सभेच्या सात दिवस अगोदर हे प्रश्न महापौरांना दिले जातात. ते स्विकारायचे की नाही, हे महापौरांच्या कक्षेत आहे. मात्र, सत्ताधारी भाजपच्या नवीन धोरणात नगरसेवकांना महापालिका प्रशासनाला प्रश्न विचारण्यास लगाम घातला आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, भाजप नगरसेवक तुषार कामठे याच्यासह अन्य नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नांना महापाैरांनी कित्येक दिवस स्विकारले नाहीत, त्यामुळे सत्ताधारी भाजप विरोधकांसह स्वपक्षीय नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणू लागली आहे.
दरम्यान, प्रश्न न स्विकारण्याबाबत महापौर राहूल जाधव यांना विचारले असता म्हणाले की, महापौरांनी नगरसेवक प्रश्नोत्तरांचा गैरवापर करत असल्याचा अजब दावा केला आहे. नगरसेवकांच्या प्रश्न व त्यावरील चर्चेत वेळ जातो. म्हणून, देखील प्रश्न टाळत असल्याचे ते म्हणाले. मात्र, नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारायचा नाही, तर कुठे विचारायचा, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच, महापौर नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणत नसल्याचे लक्षात आणून दिल्याने त्यांनी आपल्या भूमिकेवरुन माघार घेतली. तसेच स्वीय सहायकांना नगरसेवकांनी सभागृहासाठी दिलेले प्रश्न स्विकारण्याचे आदेश दिले.