व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे; जाधवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची वादग्रस्त पोस्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/kanak-sarkar-.jpg)
कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्राध्यापकाने महिलांच्या कौमार्यासंदर्भात आक्षेपार्ह अशी पोस्ट फेसबुकवर केली. या पोस्टमध्ये त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांनी लिहिलं आहे की, कुमारी वधू का नाही? तुम्ही कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेलं असेल तर चालेल का ? पुढे त्यांनी लिहिलं आहे की, अशी मुलं मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा माहिती नसतो.
इथंच न थांबता आपल्या पुढे कनक सरकार यांनी म्हटलं की, “मुलगी जन्माला आल्यापासून तोपर्यंत सील्ड असते जोपर्यंत ते उघडलं जात नाही. कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मूल्यं तसंच लैंगिक स्वच्छतेसोबत अनेक गोष्टी आहेत. अनेक मुलांसाठी कुमारी वधू एखाद्या परीप्रमाणे असते.”
प्रतिष्ठित विद्यापीठाच्या साक्षात प्राध्यापकांच्याच अत्यंत आक्षेपार्ह व हिणकस अशा या पोस्टमुळे प्रचंड गदारोळ झाला. कनक सरकार यांच्या या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ होऊ लागल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. आपण काहीच चुकीचं बोललेलो नाही. राज्यघटनेने मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे असं कनक सरकार यांनी म्हटलं आहे.