स्थलांतरिताकडून मारला गेलेला भारतीय वंशाचा पोलीस हा अमेरिकी नायकच – ट्रम्प
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Donald-Trump.jpg)
कॅलिफोर्नियात अलिकडेच स्थलांतरिताच्या गोळीबारात मरण पावलेले भारतीय वंशाचे पोलिस अधिकारी रोनिल रॉन सिंग हे खरे अमेरिकी नायक आहेत, अशा शब्दात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बलिदानाची प्रशंसा केली. मेक्सिको सीमेवरून अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतरित येतात, त्यामुळे तेथील सीमेवर भिंत बांधण्याचा ट्रम्प यांचा हट्ट सुरूच असून ते डेमोक्रॅटिक पक्षाला या भिंतीसाठी पैसे देण्यासाठी राजी करण्याच्या प्रयत्नात आहेत पण त्यांना यश आलेले नाही. सिंग हे ३३ वर्षांचे होते व स्टॅनिस्लॉस परगण्यात न्यूमन पोलिस खात्यात काम करीत होते. त्यांना २६ डिसेंबर रोजी मेक्सिकोतून आलेल्या एका स्थलांतरिताने गोळ्या घालून ठार केले होते. ट्रम्प यांनी सांगितले, की ख्रिसमसनंतर देशातील एका तरुण पोलिस अधिकाऱ्याचा बेकायदा स्थलांतरिताने बळी घेतला आहे. असा कुणाचा जीव घेण्याचा अधिकार त्याला कुणी दिला होता.
भारतीय वंशाचे पोलिस अधिकारी रोनिल रॉन सिंग यांच्या विधवा पत्नीची व सहकाऱ्यांची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दूरध्वनीवर विचारपूस केली. मारले गेलेले सिंग (वय ३३) हे न्यूमन पोलिस खात्यात कामाला होते. २६ डिसेंबरला वाहतूक थांब्यावर गुस्ताव पेरेझ अरियागा या स्थलांतरिताने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तो मेक्सिको या मूळ देशात पळून जात होता. दुपारी ट्रम्प हे सिंग यांचे कुटुंबीय, त्यांच्या सहकारी पोलिसांशी बोलले, असे व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले. सिंग हे फिजीचे रहिवासी होते व अमेरिकी पोलिस दलात जुलै २०११ मध्ये भरती झाले.