जादा जागांसाठी राष्ट्रवादीचा काँग्रेसवर दबाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/rahul-sharad-pawar.jpg)
- शरद पवार व राहुल गांधी यांच्यात चर्चा; मित्रपक्षांच्या जागांनंतरच निश्चिती
मुंबई – राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीतील बुधवारी सायंकाळी झालेल्या भेटीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गत वेळच्या तुलनेत जास्त जागा सोडाव्यात म्हणून राष्ट्रवादीचा गांधी यांच्यावर दबाव असून, काँग्रेस नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीला झुकते माप देते का, याबाबत उत्सुकता असेल.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी राहुल गांधी हे आले होते. या वेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे सहभागी झाले होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे. जागावाटपासाठी राज्यातील नेत्यांमध्ये मुंबईत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये ४० जागांवर एकमत झाले आहे. जागावाटपाचा तिढा आता पवार आणि गांधी यांच्या पातळीवर सोडविला जावा, अशी उभय पक्षांच्या प्रदेश नेत्यांनी घेतली होती. यानुसार पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली.
जागावाटपात लोकसभा आणि विधानसभेत निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह राष्ट्रवादीने धरला होता. लोकसभेसाठी काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ जागांचे सूत्र २००४ आणि २००९ मध्ये निश्चित झाले होते. २०१४ मध्ये काँग्रेसने २७ तर राष्ट्रवादीने २१ जागा लढविल्या होत्या. यंदा जास्त जागांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनी राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य केलेले नाही. या तुलनेत शरद पवार यांनी गांधी कुटुंबीयांचे समर्थनच केले आहे. महाराष्ट्रातील जागावाटप आपल्या कलाने व्हावे, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. काँग्रेसने २५ तर राष्ट्रवादीने २३ जागा लढवाव्या, असा काँग्रेस नेत्यांचा प्रस्ताव आहे.
दोन्ही पक्षांनी निवडून येऊ शकतील या जागांवर आधीच निर्णय घेतला आहे. नगरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली.
जागावाटपाबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली, पण अंतिम जागावाटप निश्चित झालेले नाही. मित्रपक्षांना किती जागा सोडाव्या लागतात याचा अंदाज आल्यावरच अंतिम जागावाटप निश्चित केले जाईल. देशातील राजकीय परिस्थितीवरही या भेटीत चर्चा झाली.
– प्रफुल्ल पटेल,खासदार