आयफोनसाठी १७ वर्षीय तरूणाने विकली होती किडनी, आता भोगतोय मरणयातना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Iphone-e1546404341667.jpg)
आपली सुखासीन जीवनशैली आणि आर्थिक सुबत्ता दाखवण्यासाठी आयफोन विकत घेतला जातो. आयफोनची किंमत सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरची असते. त्यामुळे आयफोन खरेदी करण्यासाठी किडणी विकू काय असे उपहासाने म्हटले जाते. मात्र, चीनमध्ये एका मुलानं आयफोनसाठी चक्क स्वतःची किडनी विकल्याची घटना समोर आली आहे. या तरुणानं किडनी विकून आयफोन खरेदी केला खरा. परंतु, आता या तरुणाला त्याची चूक समजली असून तो गेल्या सात वर्षांपासून अंथरुणाला खिळून पडल्याने मरण यातना भोगत आहे. सात वर्षापूर्वी १७ वर्षाचा असताना जिओ वँगने आयफोन चार घेण्यासाठी चक्क स्वत:ची किडनी विकली होती.
जिओ वँग या तरूणाने आयफोन घेण्यासाठी आपली किडनी विकली. ‘आयफोन-4’ ज्यावेळी लाँच झाला तेव्हा जिओ वँग अवघ्या 17 वर्षांचा होता. आयफोन विकत घेवून मित्रांमध्ये शायनिंग मारण्यासाठी त्यानं किडनी विकण्याचा निर्णय घेतला. वँगने एक किडनी 3,200 अमेरिकन डॉलरला (2,23,265 रुपये) विकली. या पैशातून त्याने ‘आयफोन-4’ खरेदी केला. वँग आता 24 वर्षांचा आहे.
एक किडनी काढल्यानंतर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. आठवडाभरानंतर तू पूर्वीसारखाच तंदुरुस्त होशील असे वँगला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते, परंतु किडनीची शस्त्रक्रिया करताना दुर्दैवाने त्याला संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या 7 वर्षांपासून तो अंथरुणाला खिळून पडला आहे.