पंतप्रधान आवास योजनेंच्या पिंपरी व आकुर्डीतील घरांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/images-14.jpg)
स्थायी समितीसमोर ठेवला मंजुरीसाठी प्रस्ताव
पिंपरी ( महा ई न्यूज ) – केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वांत कमी दराच्या ठेकेदारास काम देण्याबाबत करारनामा करण्यास मान्यता देण्याचा विषय मंगळवारी (ता. १) होणाऱ्या महापालिका स्थायी समोर ठेवला आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात चऱ्होली, मोशीतील बोऱ्हाडेवाडी, रावेत, वाकड, किवळे, पिंपरी, आकुर्डी आदी ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सर्व मिळून सुमारे नऊ हजार ४५८ घरे उभारण्यात येणार आहेत. त्यातील चऱ्होली प्रकल्पाच्या कामाचे आदेश दिले आहेत. आता पिंपरी आरक्षण क्रमांक ७७ आणि आकुर्डी आरक्षण क्रमांक २८३ येथील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पिंपरी प्रकल्पात ३७० आणि आकुर्डी प्रकल्पात ५६८ असे ९३८ घरे साकारण्यात येणार आहेत. दोन्ही प्रकल्पांसाठी कमी दराच्या निविदा नटवर कन्स्ट्रक्शनच्या महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुक्रमे ३१ कोटी ८२ लाख आणि ५२ कोटी ५० लाख रुपये दराच्या आहेत. महापालिकेच्या स्वीकृत दरापेक्षा कमी रकमेच्या आहेत. शिवाय ठेकेदार अटी व शर्तींनुसार काम करण्यास तयार असल्यामुळे त्यांच्याशी करार करण्यास मान्यता देण्याचा विषय प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.