मध्यप्रदेशात भाजपाच्या बाजूने गेलेल्या पाच गोष्टी ठाऊक आहेत का?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/shivraj-singh-chouhan-759.jpg)
राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेतील दोन महत्वाच्या राज्यांमध्ये भाजपाचा पराभव होणार हे स्पष्ट असले तरी मध्य प्रदेशमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. या राज्यात क्षणाक्षणाला निकालाचे आकडे बदलताना दिसत आहेत. कधी भाजपा तर कधी काँग्रेस पुढे आहे. त्यामुळे इथे कोणाचे सरकार येईल ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर या राज्यात भाजपाला कुठल्या मुद्यांचा फायदा झाला आणि कुठले विरोधात गेले त्याचा घेतलेला आढावा.
शिवराज सिंह चौहान आणि भाजपाला अनुकूल असलेले मुद्दे
– मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याबद्दल लोकांच्या मनात थेट नाराजीची भावना नाही.
– २००३ मध्ये काँग्रेसचा पराभव करुन भाजपाने मध्य प्रदेशची सत्ता मिळवली. त्यावेळी दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २००३ च्या निवडणुकीत वीज, रस्ते आणि पाणी या प्रश्नांवरुन लोकांच्या मनात सरकारविरोधात एक रोष होता. तितका राग शिवराज सिंह चौहान यांच्या सरकार विरोधात दिसलेला नाही.
– मध्य प्रदेशात भाजपाची संघटनात्मक शक्ती आहे. त्याचा भाजपाला फायदा होतो. आरएसएसचे सुद्धा मध्य प्रदेशात मोठे जाळे आहे. संघटनात्मक शक्तीमुळे भाजपा राज्यात तळागाळात पोहोचला आहे.
– शिवराज सिंह चौहान यांची स्वच्छ प्रतिमा ही सुद्धा भाजपासाठी जमेची बाजू आहे. शेतकऱ्याचा मुलगा ही आपली ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
– राज्य सरकारने ज्या योजना आणल्या त्यामुळे समाजातील दुर्बल घटक आणि झोपडपट्टी धारकांचा विद्यमान मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे.
शिवराज सिंह चौहान आणि भाजपा विरोधात जाणारे मुद्दे
– मध्य प्रदेशात भाजपाला मोठया प्रमाणावर बंडखोरीचा सामना करावा लागला. ज्यांना पक्षाकडून तिकिट मिळाले नाही किंवा अपेक्षित पद मिळले नाही त्यांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन भाजपासमोर आव्हान निर्माण केले.
– एससी/एसटी अॅट्रोसिटी कायदा तसेच इंधनाच्या वाढत्या किंमतीवरुन उच्च जाती आणि मध्यम वर्गामध्ये नाराजीची भावना आहे.
– काही व्यावसायिक आणि शेतकरी वर्गही भाजपावर नाराज आहे. त्यांनी आपल्या मनातील नाराजीची भावना जाहीरपणे बोलूनही दाखवली.