‘शनिवारवाडय़ाचे प्रांगण राजकीय सभांना द्या!’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Culture-Shaniwarwada-pune-full.jpg)
शनिवारवाडय़ाचे पटांगण राजकीय सभांसाठी भाडय़ाने देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय बालगुडे यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. शनिवारवाडय़ावरील सभा हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग आहे. त्यामुळे त्याबाबत त्वरित आदेश काढून सभा आणि राजकीय कार्यक्रमासाठी पटांगण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन महापौरांना देण्यात आले आहे.
शनिवारवाडय़ाचे पटांगण राजकीय कार्यक्रमांसाठी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर संजय बालगुडे यांनी ही मागणी केली आहे. शनिवारवाडय़ाच्या पटांगणावर स्वातंत्रपूर्व काळापासून सभा होत आल्या आहेत. राजकीय तसेच सामाजिक चळवळीत सदैव कार्यरत असलेल्या अनेक नेत्यांनी येथे सभा गाजविल्या आहेत. मात्र सध्या सभेसाठी पटांगण देण्यात येणार नाही, असा निर्णय झाला आहे. सभेसाठी प्रथम पोलिसांची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
वास्तविक महापालिकेची जागा भाडय़ाने घेण्यासाठी पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकताच नाही. त्यामुळे राजकीय सभांना शनिवारवाडय़ाचे पटांगण देण्याबाबतचे आदेश तातडीने काढण्यात यावेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.