तरुणीवर घरात घुसून बलात्कार आणि हत्या
पुणे शहरात एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर घरात घुसून बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, आज शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, पीडित मुलगी ही १७ वर्षांची आहे. पुणे शहराजवळच्या धायरी येथे ही घटना घडली. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्यावर बलात्कार करुन गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
पीडितेचे आई-वडील गुरुवारी संध्याकाळी कामावरुन घरी परतल्यानंतर घरात ती निपचित पडल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, सिंहगड पोलिसांना आज या हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तिच्यावर बलात्कार करुन गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.