“संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा डाव”; डीलिमिटेशनवरून राज ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबई | मतदारसंघ फेररचना (डीलिमिटेशन) आणि महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कालच शरद पवार यांचा उल्लेख ‘जंतर मंतर’ असा करत टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज (रविवार, दि. २९ नोव्हेंबर) कल्याण-डोंबिवली दौऱ्यावरून या विषयावर सडेतोड भाष्य केले. “संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा हा मोदी सरकारचा डाव असून भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण हा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही,” असा खळबळजनक दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राज ठाकरे म्हणाले की, “एक गोष्ट प्रामुख्याने पाहणे गरजेचे आहे की हे सगळे का चालू आहे? महिला आरक्षणाच्या आडून ५४३ वरून ८१६ खासदार करायचे आहेत कशासाठी? सध्याचे ५४३ खासदार काय दिवे लावत आहेत की तुम्हाला आणखी खासदार वाढवायचे आहेत? रोजच्या रोज राज्यांचे प्रश्न बिकट होत आहेत. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर प्रत्येक राज्याला काय मिळणार आहे? संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे.”
हेही वाचा
दिघीकरांचा ‘एक हात मदतीचा’; चार गावांतील सुमारे हजार कुटुंबांना दिलासा
राज्यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, “मी हे निश्चितपणे सांगतो की भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण हा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. दक्षिण म्हणजे मी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गोवा आणि तमिळनाडू ही राज्ये धरतो. मुघल या भागाला ‘दख्खन’ म्हणायचे आणि नंतर इंग्रज ‘डेक्कन’ म्हणू लागले; त्यामुळे महाराष्ट्र हा दक्षिणेचाच भाग आहे. भविष्यात या राज्यांवर मोठा अन्याय होणार असून, सर्व राज्यांना केंद्रावर अवलंबून ठेवण्याचा हा डाव आहे. याच्या खोलात अनेक गोष्टी आहेत, त्या हळूहळू तुम्हाला कळतील.”
निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचे विधान
यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “निवडणूक आयोगावर माझा विश्वासच नाही. ज्या प्रकारचा कारभार चालू आहे, तो संपूर्ण देशाला दिसतोय. यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? सर्वच संस्था केंद्रातील राज्यकर्त्यांनी ताब्यात घ्यायचे ठरवले, तर सर्वसामान्यांना कोण न्याय देणार आहे?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.




