मुंबईत १ डिसेंबरला रंगणार ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड २०२६’; ना.डॉ.उदय सामंत प्रमुख पाहुणे!
मराठी माध्यमविश्वातील मान्यवरांचा होणार गौरव, लोककलेची बहारदार मेजवानी

मुंबई । प्रतिनिधी
माध्यमविश्वातील पडद्यावर आणि पडद्यामागे राहून योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान, मराठी कला-संस्कृतीचा गौरव आणि मनोरंजनाची रंगत असा त्रिवेणी संगम असलेला दुसरा ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ सोहळा मंगळवार, १ डिसेंबर रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपन्न होणार आहे.
मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) साठी माईमीडिया२४ प्रस्तुत आणि राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग पुरस्कृत या सोहळ्याला मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत हा सोहळा रंगणार आहे.
प्रसारमाध्यमे ही केवळ माहिती पोहोचविण्याचे साधन नसून समाजाचे प्रतिबिंब दाखवणारी आणि समाजाला दिशा देणारी प्रभावी शक्ती आहेत. माध्यमविश्वाच्या जडणघडणीत पत्रकार, संपादक, छायाचित्र पत्रकार, तंत्रज्ञ, कलाकार तसेच पडद्यामागील अनेक व्यक्तींचे योगदान महत्त्वपूर्ण असते. अशाच गुणवंतांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा
खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतील ९ हजार ५०० हून अधिक कुटुंबांना ‘मदतीचा हात’
पत्रकारिता, छायाचित्र पत्रकारिता, संपादन, राजकीय व मनोरंजन क्षेत्र, सामाजिक-सांस्कृतिक कार्य, शिक्षण, मराठी भाषा, लोककला, उद्योग, आरोग्य, जनसंपर्क आणि रंगभूमी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना यंदा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाचा या निमित्ताने सन्मान होणार आहे.
पुरस्कार सोहळ्याबरोबरच महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांची खास मेजवानीही उपस्थितांना अनुभवता येणार आहे. गण-गवळण, शाहीरी फटका आणि वगनाट्याचा झटका अशा सांस्कृतिक सादरीकरणांनी सोहळ्यात मराठमोळा रंग भरला जाणार आहे. यासोबतच प्रेक्षकांसाठी ‘महाराष्ट्र बाजार पेठ’ ची स्त्री-पुरुषांसाठी आकर्षक लकी ड्रॉ बक्षिसे अशी विविध आकर्षणेही यात सहभागी करण्यात आली आहेत.
मुंबईच्या मध्यवर्ती भागातील दादर येथे होणारा हा सोहळा पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती, लोककला आणि माध्यमविश्व यांना एकत्र आणणारा उत्सव ठरणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठीही या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध असून, शनिवार, २८ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे सोहळ्याची सन्मानिका मायबाप प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे.( काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.)
‘मराठी जोडू, मराठी सक्षम करू… गौरव आपल्याच माणसांचा!’ या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यात मराठी माणसांनी महाराष्ट्रीय जणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक प्रो. शीतल हरीश करदेकर, संपादक माईमीडिया२४ तथा संस्थापक अध्यक्ष, मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया यांनी केले आहे.
माध्यमविश्वातील कर्तृत्वाचा सन्मान, मराठी संस्कृतीचा अभिमान आणि मनोरंजनाची रंगत अनुभवण्याची संधी देणारा हा सोहळा दादरमध्ये विशेष आकर्षण ठरणार आहे.




