‘वायसीएम’च्या औषधपुरवठ्यावर दरवर्षी श्वेतपत्रिका काढा, महापौर रवि लांडगे यांचे आदेश
भाजपा नगरसेवक माऊली जगताप यांनी सर्वसाधारण सभेत मांडला औषधटंचाईचा मुद्दा

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा पाठिंबा; आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या औषधपुरवठ्याबाबत दरवर्षी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचे आदेश महापौर रवि लांडगे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांना दिले. भाजपा नगरसेवक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत औषधटंचाईचा मुद्दा उपस्थित करत रुग्णालयाच्या कारभाराबाबत अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केला. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी जगताप यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर महापौरांनी हे निर्देश दिले.
‘वायसीएम’च्या कारभारावर लेखा विभागाने ताशेरे ओढले आहेत, असे जगताप यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आपण दिलेल्या पत्राला अधिकारी परस्परविरोधी उत्तरे देत आहेत आणि कामे जादा दराने देण्यात आली आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ‘वायसीएम’च्या या भोंगळ कारभाराला नेमके कोणते अधिकारी जबाबदार आहेत, असा सवाल जगताप यांनी सर्वसाधारण सभेत केला.
हेही वाचा
साकुर्डीत ४०० मदत किटचे वाटप, माजी महापौर राहुल जाधव यांचा पुढाकार!
औषधपुरवठ्यास विलंब करणाऱ्या काही पुरवठादारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आणि निविदेतील अटींनुसार त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला, असे प्रशासनाने सांगितले. आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे औषधांच्या कच्च्या मालाचा तुटवडा आणि दरवाढ झाल्याने पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे कारणही पत्रात नमूद करण्यात आले आहे. महापालिका नियमित खरेदीसाठी २१ निविदाधारकांकडून ६२६ प्रकारची औषधे घेते. तातडीच्या खरेदीसाठी तीन स्वतंत्र निविदाधारकांची व्यवस्था असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याचे मान्य
जगताप यांनी ‘वायसीएम’मधील औषधांच्या कमतरतेबाबत २२ सप्टेंबर २०२६ रोजी महापालिकेला पत्र दिले होते. त्यावर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वाक्षरीसह लेखी उत्तर देत औषधसाठा, खरेदी, वितरण आणि पुरवठादारांवरील कारवाईची माहिती दिली. दोन ते तीन आठवडे काही औषधांचा तुटवडा होता आणि त्या काळात काही रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगण्यात आले होते, असे आरोग्य विभागाने या उत्तरात मान्य केले होते. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत एका निविदाधारकाने पुरवलेली काही औषधे निर्धारित गुणवत्तेची नसल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर संबंधित पुरवठादाराचा पुरवठा थांबवण्यात आला आणि औषध उत्पादक कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले, असे आरोग्य विभागाचे प्रमुख लक्ष्मण गोफणे यांनी सभागृहात सांगितले.
“वायसीएममध्ये औषधटंचाई होती आणि काही रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागली, हे प्रशासनानेच लेखी मान्य केले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांवर औषधखरेदीचा अतिरिक्त भार पडणे योग्य नाही. पुरवठ्यातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करून दर्जेदार औषधांचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करावा. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते की नाही. याबाबत प्रतिवर्षी श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. गोरगरिब नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी. या करिता मी आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे.”
– ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप, नगरसेवक, भाजपा.




