IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने पुण्यातील महिला डॉक्टरची ३ लाखांची फसवणूक!
सायबर भामट्यांनी मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून दाखवली अटकेची भीती; ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पैशांची मागणी

पुणे : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. आता थेट वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्यातील एका महिला डॉक्टरची तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला असून, याप्रकरणी ४३ वर्षीय महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात फिर्यादी महिला डॉक्टरला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ‘सायबर सेल ऑफ इंडिया’मधून चौधरी बोलत असून, विश्वास नांगरे पाटील यांचा सहाय्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून समोरील व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.
संबंधित महिलेचे आधार कार्ड एका संशयास्पद मोबाइल क्रमांकाशी जोडले गेले असून, तिचे नाव अवैध जाहिरातबाजी, अश्लील संदेश, मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांशी जोडले असल्याचा दावा आरोपींनी केला. अटक टाळायची असेल, तर सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, अशी भीतीही दाखवण्यात आली.
या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिला डॉक्टरने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर तीन लाख रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुणे सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा – आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेशशेठ बोराटे युवा मंचाची सामाजिक बांधिलकी!
नांगरे पाटील यांच्या नावाने यापूर्वीही डिजिटल अरेस्टची फसवणूक
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि ओळखीचा गैरवापर करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो आणि आवाजाची नक्कल करून व्हिडीओ कॉलद्वारे एका व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवण्यात आले होते. या प्रकरणात संबंधित व्यक्तीची तब्बल एक कोटी चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते.
या प्रकरणाचा तपास करताना सायबर सेलच्या पथकाने कानपूर आणि इंदूर येथे छापे टाकून दोन आरोपींना अटक केली होती.
कोण आहेत आयपीएस विश्वास नांगरे पाटील?
विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र केडरमधील १९९७ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते नागपूर शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांविरोधात केलेल्या धाडसी कामगिरीमुळे ते देशभरात परिचित झाले.
यापूर्वी त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अशा विविध पदांवर काम केले आहे.
तरुणांना प्रेरणा देणारे वक्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. ‘मन में है विश्वास’ आणि ‘कर हर मैदान फतेह’ ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.




