TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाराशिवच्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याचे २२७ कोटी रुपये मिळणार; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

२०२० मधील अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई रखडली होती; पुढील १५ दिवसांत रक्कम देण्याचे आदेश

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. विमा कंपन्यांनी नाकारलेली २२७ कोटी रुपयांची पीक विमा नुकसानभरपाई देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची माहिती समोर आली आहे. पुढील १५ दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आल्याने जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

२०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, संबंधित शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत पोर्टलवर नोंदवली नसल्याचे कारण देत विमा कंपन्यांनी पीक विम्याची रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अनेक वर्षांपासून रखडली होती.

७२ तासांत नोंद न केल्याचे कारण देत विमा नाकारला होता

या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी २०२१ मध्ये न्यायालयीन लढा सुरू केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना चौगुले यांनी हा धाराशिव जिल्ह्यासाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले. २०२० मध्ये ७२ तासांच्या आत पोर्टलवर नोंद न केल्याचे कारण देत शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन लढ्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  हेल्थ सप्लिमेंट्सच्या विक्रीवर FDAचा कडक वॉच! नियम मोडल्यास १० लाखांचा दंड; मृत्यू झाल्यास जन्मठेपेची तरतूद

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही या निर्णयाची माहिती दिली. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर धाराशिवच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. २०२० मधील नुकसानीनंतर तत्कालीन राज्य सरकारकडे भरपाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, विमा कंपनीकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पाटील यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांचे म्हणणे फेटाळून लावत २२७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी प्रति हेक्टर १८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्षात १० ते ११ हजार रुपये मिळाले होते. आता प्रति हेक्टर आणखी सात हजार रुपये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा दावाही पाटील यांनी केला. दरम्यान, रखडलेली नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या धाराशिवमधील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group