IND vs AUS : …तरच अश्विन अॅडलेडच्या खेळपट्टीवर यशस्वी होईल!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Ravichandran-Ashwin-1.jpg)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या खेळात भारताचा पहिला डाव २५० धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ११७ अशी केली. यात फिरकीपटू आर अश्विन याला ४ पैकी ३ बळी मिळाले. याच कामगिरीत अश्विनला सातत्य राखायचे असेल, तर त्याला संयमी गोलंदाजी करावी लागेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमात तो बोलत होता.
भारताच्या फलंदाजीच्या वेळी नॅथन लॉयन याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या दोघांना संयमी गोलंदाजी करत बाद केले. त्याप्रमाणेच अश्विनलाही अॅडलेडच्या खेळपट्टीवर यशस्वी व्हायचे असेल, तर संयमी गोलंदाजी करणे गरजेचे आहे. अश्विनने केवळ ऑफ स्पिन गोलंदाजीवर भर द्यावा. दुसरा किंवा वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू नये. या उलट त्याने आपली नेहमीची गोलंदाजी करत राहिली पाहिजे आणि फलंदाजांना हवेत फटके खेळण्यास उद्युक्त केले पाहिजे असे आगरकर म्हणाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पहिला बळी इशांत शर्माने त्रिफळाचीत केला. त्यानंतर चहापानापर्यंत हॅरिस, ख्वाजा आणि मार्श हे तीन अनुभवी खेळाडू अश्विनने तंबूत धाडले. त्यातही हॅरिस आणि ख्वाजा हे दोघे खेळपट्टीवर चांगले स्थिरावले होते. पण अश्विनने चतुर गोलंदाजी करत त्यांना माघारी धाडले.