युझवेंद्र चहलने रचला नवा इतिहास! भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला मागे टाकत केला विश्वविक्रमी पराक्रम

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग-स्पिनर युझवेंद्र चहल याने टी-२० क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. सध्या भारतीय संघापासून दूर असलेला चहल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेत तमिळनाडूविरुद्ध झालेल्या सामन्यात भेदक गोलंदाजी करत चहलने ३ बळी घेतले आणि टी-२० क्रिकेटमध्ये ४०० बळी (विकेट्स) पूर्ण करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात अवघ्या १६ धावा खर्च करून ३ महत्त्वाचे गडी बाद केले. या कामगिरीसह त्याच्या टी-२० कारकिर्दीतील एकूण बळींची संख्या ४०२ वर पोहोचली आहे. २०२३ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासून तो भारतीय टी-२० संघातून बाहेर असला, तरी आयपीएल, काऊंटी क्रिकेट आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने आपली धार कायम राखली आहे.
हेही वाचा
Good News । नाशिक फाटा-खेड आठपदरी ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ भूसंपादन पूर्ण!
टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
- ४०२ विकेट्स – युझवेंद्र चहल
- ३६६ विकेट्स – भुवनेश्वर कुमार
- ३५४ विकेट्स – जसप्रीत बुमराह
- ३२९ विकेट्स – पियुष चावला
- ३२३ विकेट्स – आर. अश्विन
- ३०० विकेट्स – अक्षर पटेल
- २९४ विकेट्स – अर्शदीप सिंग
हरियाणाचा तमिळनाडूवर दणदणीत विजय
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील या सामन्यात युझवेंद्र चहल आणि निशांत सिंधू (प्रत्येकी ३ बळी) यांच्या फिरकीपुढे तमिळनाडूचा संपूर्ण संघ २० षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या १२४ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात हरियाणा संघाने १६.१ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य सहज गाठले. ३ बळी घेण्यासोबतच ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावांची अष्टपैलू खेळी करणाऱ्या निशांत सिंधू याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.




