TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

निदा खानला आश्रय देण्यासाठी मदत केल्याचा आरोप; न्यायालयात हजर राहिल्यानंतर जामीन अर्ज मंजूर, जलील यांनी आरोपांवर दिले स्पष्टीकरण

नाशिक : नाशिकमधील चर्चेत असलेल्या TCS प्रकरणात एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला. निदा खान पसार असताना तिला लपण्यासाठी मदत केल्याचा आरोप जलील यांच्यावर करण्यात आला होता. न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर जलील आज न्यायालयात हजर झाले होते.

नाशिक न्यायालयात न्यायमूर्ती खारकर यांच्यासमोर जलील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. तपासादरम्यान मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरून निदा खानला आश्रय दिल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर जलील यांना न्यायालयात हजर राहावे लागले.

‘कायदेशीर सल्ला देणे हा गुन्हा नाही’ – इम्तियाज जलील

जामीन मिळाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणत्याही आरोपीला कायदेशीर प्रक्रियेसंदर्भात मदत करणे हा गुन्हा ठरू शकत नाही. पोलिसांनी तपासादरम्यान आपली भूमिका समोर आणल्याचा दावा केला असला, तरी आपण या प्रकरणाबाबत सभेतही भूमिका मांडली होती, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  नाना पटोले यांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘वर्षा’वर भेट; राजकीय चर्चांना उधाण!

निदा खानची भेट घेतल्यानंतर तिने आपली बाजू मांडली होती. तिच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात तिचा कोणताही सहभाग नव्हता. तिचे म्हणणे खरे असल्यास आपण तिच्या पाठीशी उभे राहू, मात्र तिला वाचवण्यासाठी कोणतीही बेकायदेशीर मदत करणार नसून केवळ कायदेशीर सल्ला देऊ शकतो, असे आपण स्पष्ट केले होते, असे जलील यांनी सांगितले.

निदाची कौटुंबिक पार्श्वभूमी मजबूत नसल्याने तिला कायदेशीर मार्गदर्शनाची गरज होती, असेही जलील म्हणाले. “कायदेशीर बाबींमध्ये कोणाला सल्ला देणे गुन्हा असेल, तर सर्व वकिलांनाही तुरुंगात टाकावे लागेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

निदा खान प्रकरणाचीही चर्चा

दरम्यान, नाशिकमधील कथित धर्मांतर आणि छळ प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून निदा एजाज खान हिचे नाव समोर आले होते. या प्रकरणानंतर कंपनी आणि पोलिसांकडून तिच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. तिच्या पतीनेही घटस्फोटाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. निदा सध्या गर्भवती असून, तिला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणातील आरोप, तपासातील दावे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत पुढील न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group