TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचा नवा दावा; VSR कंपनीच्या मालकाने पाच विमाने अमेरिकेत हस्तांतरित केल्याचा आरोप

व्ही. के. सिंग देशाबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा; अमित शाह यांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी, महत्त्वाचे पुरावे सादर करणार असल्याचे संकेत

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. VSR कंपनीचे मालक व्ही. के. सिंग हे अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती असून, त्यांनी पाच विमाने अमेरिकेत हस्तांतरित केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातही दावा केला होता. त्यानंतर भाजपकडून आक्रमक भूमिका मांडण्यात आली होती. आता रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाबाबत नवा दावा केला आहे.

अमित शाह यांना पत्र; सीबीआय चौकशीची मागणी

रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काही शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याची मागणी केली आहे. पत्रातील प्रश्नांवर अमित शाह यांच्या उत्तराची प्रतीक्षा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाचे पुरावे हाती आल्याचा दावा करत ते आगामी काळात सादर करणार असल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. व्ही. के. सिंग यांची दोन मुले अमेरिकेत राहायला गेली असल्याची माहितीही त्यांनी दिली. व्ही. के. सिंग यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भातील माहिती अमित शाह यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  नाशिक TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर; ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

‘अजितदादांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे’

अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण एका पुतण्याच्या भूमिकेतून प्रयत्न करत असल्याचे रोहित पवार म्हणाले. या प्रकरणावर केलेले सादरीकरण राजकीय नसून अराजकीय दृष्टिकोनातून केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या प्रमुख म्हणून आपली भूमिका मांडली असून, पवार कुटुंबातील सदस्य म्हणून विचारल्यास त्यांचा पाठिंबा राहील, असे रोहित पवार यांनी सांगितले.

विविध नेत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार

अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि खासदार नीलेश लंके यांच्यासह अनेक नेत्यांनी पाठिंबा दिल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

“राजकारण आज नाही तर उद्या करता येईल; मात्र अजितदादांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, व्ही. के. सिंग आणि विमान हस्तांतरणाबाबत रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांवर संबंधित कंपनी किंवा अधिकृत यंत्रणांची भूमिका समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group