सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम; ३,५०० रुपयांच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा नाही; कारखानदारांकडून दोन दिवसांची मुदत, २२ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा विजय रणदिवे यांचा इशारा

सोलापूर : जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैठकीनंतरही ऊस दरावर एकमत होऊ शकले नाही. शेतकरी संघटनांनी पहिली उचल प्रतिटन ३ हजार ५०० रुपये देण्याची मागणी कायम ठेवली, तर कारखानदारांनी ३ हजार १५० रुपयांपेक्षा अधिक दर देणे शक्य नसल्याची भूमिका मांडली.
बैठकीच्या सुरुवातीलाच शेतकरी संघटनांनी पहिली उचल प्रतिटन ३ हजार ५०० रुपये देण्याची मागणी केली. मात्र, कारखानदारांनी हा दर देण्यास असमर्थता दर्शवली. ३ हजार ५०० रुपयांच्या मागणीवर संघटना ठाम राहिल्यास कारखाने बंद ठेवण्याची भूमिका कारखानदारांनी मांडल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाचा ३,२५० रुपये पहिली उचल देण्याचा प्रस्ताव
यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यस्थी करत पहिली उचल प्रतिटन ३ हजार २५० रुपये आणि गाळप हंगाम संपल्यानंतर आणखी १०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी कारखानदारांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. प्रशासनाकडून या दराबाबत कारखानदारांना सूचना देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
दुसरीकडे, शेतकरी संघटना पहिली उचल ३ हजार ३०० रुपये, गाळप संपल्यानंतर १०० रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी १०० रुपये, असा एकूण प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दर देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
हेही वाचा – बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती; १८.२० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यात कार्तिकी वारी असल्याने पुढील दोन दिवस कारखानदारांच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले. कारखानदारांनी दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास आणखी एक दिवस प्रतीक्षा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२२ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा विजय रणदिवे यांनी दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा तूर्त कायम असून, कारखानदार पुढील दोन दिवसांत काय निर्णय घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




