Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती; १८.२० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय; भाविकांसाठी पाथवे, अंतर्गत रस्ते, वाहनतळ आणि तीन हजार क्षमतेचे सत्संग भवन उभारणार

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यातील एकूण १८ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

विधान भवनातील कॅबिनेट हॉलमध्ये ही बैठक झाली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री तथा कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार डॉ. अशोकराव माने, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन सहभागी झाल्या होत्या.

श्री क्षेत्र बाहुबलीसाठी नऊ कोटींची कामे

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा कुंभोज येथील श्री क्षेत्र बाहुबलीच्या विकासासाठी नऊ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तीर्थक्षेत्र परिसरात पाथवे तयार करणे, शाळेच्या प्रांगणात पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि काँक्रिटीकरण करणे, भाविकांसाठी बाकड्यांची व्यवस्था करणे, प्रशासकीय कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश आहे.

तसेच अंतर्गत रस्त्यांच्या बाजूने सोलर स्ट्रीट लाईट उभारण्यात येणार आहेत. माईन कुंडी ते मुख्य मंदिराला जोडणाऱ्या अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचेही बांधकाम केले जाणार आहे. या सुविधांमुळे भाविकांची ये-जा आणि परिसरातील अंतर्गत वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा –  पशुसंवर्धन विभागाच्या २१ योजनांचा लवकरच ऑनलाइन शुभारंभ; शेतकरी, महिला आणि युवकांना स्वयंरोजगाराची संधी

कुंथुगिरी तीर्थक्षेत्रासाठी ९.२० कोटींचा निधी

हातकणंगले तालुक्यातील मौजे आळते येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी नऊ कोटी २० लाख ६४ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

या आराखड्यात मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाहनतळाचे काँक्रिटीकरण आणि उर्वरित संरक्षण भिंतीचे बांधकाम यांचा समावेश आहे. याशिवाय तीन हजार व्यक्तींची क्षमता असलेली आरसीसी सत्संग भवन इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांना प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे श्री क्षेत्र बाहुबली आणि श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे येणाऱ्या भाविकांना सुधारित पायाभूत सुविधा मिळणार असून, दोन्ही तीर्थक्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group