Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पशुसंवर्धन विभागाच्या २१ योजनांचा लवकरच ऑनलाइन शुभारंभ; शेतकरी, महिला आणि युवकांना स्वयंरोजगाराची संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महिन्यात पोर्टलचे उद्घाटन; शेळी-मेंढीपालन, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनासाठी मिळणार अनुदान

मुंबई : पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या २१ योजनांचा ऑनलाइन पोर्टलद्वारे या महिन्यात शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पोर्टलचे उद्घाटन होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. या योजनांमुळे शेतकरी, बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव एन. रामस्वामी, सहआयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, शेळी-मेंढी गटांचे वाटप, दुधाळ गायी-म्हशींचे संगोपन, कुक्कुटपालन आणि इतर पशुपालन व्यवसायांसाठी या योजनांमधून निधी व शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळेल.

मराठीतूनही ऑनलाइन अर्ज करता येणार

पशुसंवर्धन विभागाने महाआयटीच्या समन्वयातून ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. इच्छुक लाभार्थ्यांना ‘महा आयडी’ तयार करून या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी मराठी भाषेचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या २१ योजनांसाठी राज्य शासनाच्या नऊ, जिल्हा वार्षिक योजनेतील नऊ आणि अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या तीन योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

हेही वाचा –  राज्यातील बंदरांची माल हाताळणी क्षमता वाढविणार; विकासासाठी शासनाचे सर्व सहकार्य मिळणार

दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनासाठी विविध प्रकल्प

विभागाच्या सादरीकरणात योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, भज-क प्रवर्गासाठीच्या योजना, राज्यस्तरीय नऊ योजना, जिल्हा वार्षिक योजनेतील नऊ योजना आणि अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या तीन योजनांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय योजनांमध्ये पाच दुधाळ गायी किंवा म्हशींचा प्रकल्प, ५० शेळ्या किंवा मेंढ्या आणि पाच नरांचा गट, पाच हजार अंडी देणाऱ्या कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प, तीन हजार ते पाच हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांचा प्रकल्प, दर आठवड्याला एक हजार अंडी उबविण्याची क्षमता असलेले यंत्र, पाच माद्या व एक नर यांचा वराहपालन गट, मुरघास संयंत्र तसेच पशुसंवर्धन कर्जावरील व्याज सवलतीचा समावेश आहे.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एक किंवा दोन दुधाळ जनावरांचे गट, पाच शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर, तसेच दहा शेळ्या किंवा मेंढ्या व एक नर अशा गटांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय ५०० कुक्कुट पक्ष्यांचे वाटप, हायड्रोपोनिक चारा उत्पादन आणि मिनी टीएमआर उपकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे.

अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजनांमध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आणि चराईसंदर्भातील योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसायाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group