Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांसाठी ६,८४० कोटींच्या निधीची शिफारस; मार्चपासून बांधकामाचे नियोजन

प्रत्येक जिल्ह्यात १००, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांची वसतिगृहे उभारणार; भटक्या-विमुक्त समाजासाठी जानेवारीत राज्यभर ५०० विशेष शिबिरे

मुंबई : ओबीसी समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या बांधकामासाठी आगामी पुरवणी मागण्यांमध्ये ६ हजार ८४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांची, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली वसतिगृहे उभारण्याचा निर्णय ओबीसी संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही माहिती उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ओबीसी संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ओबीसी समाजाच्या शैक्षणिक सुविधा, भटक्या-विमुक्त समाजाचे प्रश्न, घरकुल योजना आणि विविध समाजघटकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मार्चपासून वसतिगृहांच्या बांधकामाला सुरुवात

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याकरिता महसूल विभागाच्या अखत्यारीतील जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांची, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत.

या वसतिगृहांचे डिझाइन तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत त्याला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चपासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

भटक्या-विमुक्त समाजासाठी राज्यभर ५०० विशेष शिबिरे

भटक्या-विमुक्त आणि घुमंतू समाजातील नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ६, ७ आणि ८ जानेवारी रोजी राज्यभर सुमारे ५०० विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या शिबिरांच्या माध्यमातून व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांना जन्मदाखले, आधारकार्ड आणि अन्य आवश्यक ओळखपत्रे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील कोणताही भटक्या-विमुक्त किंवा घुमंतू समाजातील नागरिक आवश्यक कागदपत्रांपासून वंचित राहू नये, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

हेही वाचा –  विहिरीत पडलेल्या दुर्मीळ ब्लॅक पॅंथरच्या पिल्लाला वनविभागाने दिले जीवदान; उदय सामंतांकडून टीमचे कौतुक

धनगर, वाडी, कोळी समाजाच्या मागण्यांवरही चर्चा

राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. धनगर, वाडी, कोळी यांसह भटक्या-विमुक्त समाजातील विविध घटकांच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. या समाजघटकांना घरे, वसाहती आणि जागा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

विविध समाजांचे प्रतिनिधी शासनाकडे निवेदने सादर करीत असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांचा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती विचार करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उपसमितीला आवश्यक सूचना दिल्या आहेत. समाजाच्या हक्काचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि देखरेख केली जात असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध विभागांनी उपक्रम राबवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

ओबीसींच्या शासकीय नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करा : छगन भुजबळ

ओबीसी समाजाचे शासकीय नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व किती आहे, याची अचूक माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी सांख्यिकी विभागाने आवश्यक कार्यवाही करून वस्तुनिष्ठ आकडेवारी संकलित करावी, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केली.

वसतिगृहे पर्यावरणपूरक असावीत : पंकजा मुंडे

वसतिगृहांच्या इमारतींचे बांधकाम करताना पर्यावरणपूरक बाबींना प्राधान्य द्यावे. इमारतींमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group