अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती देण्याचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निर्देश…
महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणे, पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना…

पिंपरी : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील बागवानी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षक उपस्थित होते.
बैठकीत महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला. या भूखंडांवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून पुढील आठवड्यात निष्कासनाची कारवाई करण्याच्या सूचना संबंधित क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी आणि बीट निरीक्षक यांना देण्यात आल्या.

क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची नियमित कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांना देण्यात आले. तसेच रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी सुरू असलेली प्राथमिक स्वरूपातील कामे, विशेषतः फुटिंगची कामे, यांची तातडीने पाहणी करून संबंधित ठिकाणांची यादी तयार करावी आणि नियमानुसार निष्कासनाची कारवाई प्रस्तावित करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
हेही वाचा – मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील आरोपांना महायुतीचे संयुक्त प्रत्युत्तर; छगन भुजबळ यांचा इशारा

दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत शहरात अनधिकृत बांधकामे झाल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश देण्यात आले.
शहरातील इमारतींच्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या अनधिकृत वापराबाबतही बैठकीत कारवाईचा आढावा घेण्यात आला. बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रकरणांमध्ये आवश्यक कारवाई या आठवड्यात पूर्ण करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले.




