TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेच्या निवडीत शिवेंद्रराजेंची संयमी भूमिका; महायुतीच्या एकजुटीवर भर

उदयसिंह पाटील निंबाळकर अध्यक्ष, दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी बिनविरोध; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीधर्म पाळल्याचा शिवेंद्रराजेंचा दावा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक उदयसिंह पाटील निंबाळकर, तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर महायुतीतील राजकीय घडामोडींवर भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार चर्चा झाली होती; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घडामोडींवर महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचना मित्रपक्षांपर्यंत पोहोचवल्या

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, वरिष्ठांकडून आलेल्या सूचना आणि निरोप त्यांनी युतीतील सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवले होते. मित्रपक्षांचे मतही वरिष्ठांपर्यंत कळवले होते. सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत महायुतीत चर्चा झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत निर्णय घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या आणि मागील कटुता पुन्हा निर्माण होऊ न देण्याच्या होत्या. त्यानुसार आपण काम केले. कोणाशीही परस्पर बैठक किंवा गुप्त तडजोड केली नसल्याचेही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते मकरंद पाटील, शंभूराज देसाईंना कळवले’

साताऱ्यातील एकगठ्ठा मतदान आपल्या विचाराचे असतानाही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण माघार घेतल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले. निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले, असा दावाही त्यांनी केला.

“मला भाजप आणि मुख्यमंत्री या दोनच गोष्टी माहिती आहेत. मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले ते मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी सर्वांच्या कानावर घातले. निर्णय त्यांनी घेतलेला आहे,” असे शिवेंद्रराजे म्हणाले.

हेही वाचा –  भाजपा आमदार राहुल कुल यांचा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात!

‘प्रत्येक वेळी माझेच नाव का पुढे येते?’

जिल्हा बँकेतील घडामोडींवरून आपल्याला विनाकारण जबाबदार धरले जात असल्याची खंत शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली. बँकेत आपण बाहेर असून इतर संचालक कार्यरत आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपला कुठेही उल्लेख झाला नाही; मात्र काही घडले नाही की आपले नाव पुढे केले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सातारा तालुका आणि जावळी येथून निवडणुकीत सुमारे चारशे ते साडेचारशे मतांचे बळ असतानाही पक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकीय हेवेदाव्यांसाठी बँकेचा वापर नको

सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याशी जोडलेली संस्था आहे. त्यामुळे राजकीय हेवेदावे किंवा वचपा काढण्यासाठी बँकेचा वापर करू नये, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले. अशा प्रकारांमुळे बँक अडचणीत येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्र्यांची भेट ही शाहू कला मंदिर, राजपथ आणि राधिका रोडच्या काँक्रिटीकरणासारख्या विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळवण्यासाठी होती. जावळीतील वादाबाबत वरिष्ठांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group