Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

श्वान निवारा केंद्राची पाहणी; लसीकरण, नसबंदी आणि आक्रमक श्वानांच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना

पिंपरी : शहरातील भटक्या श्वानांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता उपमहापौर शर्मिला बाबर यांनी गवळीमाथा रोड, पिंपरी येथील श्वान निवारा केंद्र आणि पशु इस्पितळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी निवारा केंद्रातील व्यवस्था, श्वानांचे लसीकरण व नसबंदी, तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत भटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील विविध भागांतून भटक्या श्वानांच्या त्रासाबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संभाव्य समस्याग्रस्त भागांची ओळख करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे उपमहापौर बाबर यांनी यावेळी स्पष्ट केले.

लसीकरण, नसबंदी आणि आक्रमक श्वानांच्या व्यवस्थापनासाठी सूचना

पाहणीदरम्यान श्वानांची संख्या, लसीकरण व नसबंदीची सद्यस्थिती, श्वान पकडण्यासाठी उपलब्ध पथके, मनुष्यबळ आणि साधनसामग्री याबाबत त्यांनी माहिती घेतली. लसीकरण व नसबंदीच्या कामाला गती देऊन ते नियमितपणे सुरू ठेवावे, तसेच चावणाऱ्या किंवा आक्रमक श्वानांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास २४ तासांच्या आत आवश्यक कार्यवाही करून त्यांना नियमानुसार सुरक्षितपणे वेगळे ठेवण्याची व्यवस्था करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. वारंवार तक्रारी येणाऱ्या भागांत प्राधान्याने कार्यवाही करावी आणि आवश्यकतेनुसार पथकांची संख्या व साधनसामग्री वाढवावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा –  बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने वाद; एकनाथ शिंदेंनी शायना एनसी यांना विधानभवनात बोलावले

श्वान निवारा केंद्रातील व्यवस्थेची पाहणी

नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असली तरी श्वान निवारा केंद्रात आणलेल्या श्वानांची योग्य काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे, श्वानांना वेळेवर अन्न व स्वच्छ पाणी, आवश्यक औषधोपचार आणि लसीकरण मिळत आहे का, तसेच केंद्रातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधा योग्य आहेत का, याची देखील त्यांनी पाहणी केली. केंद्रातील व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर, औषधे, पाणी, स्वच्छता किंवा अन्य आवश्यक सुविधांची कमतरता असल्यास ती निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांची काळजी या दोन्ही गोष्टींना प्राधान्य

शहरातील नागरिकांना रस्त्यावरून निर्भयपणे वावरता आले पाहिजे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हलगर्जीपणा होता कामा नये. त्याचवेळी मुक्या प्राण्यांशी माणुसकीने वागत त्यांच्या आरोग्याची आणि देखभालीची योग्य व्यवस्था करणेही आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा आणि श्वानांची काळजी या दोन्ही बाबींचा समतोल राखून प्रभावी कार्यवाही करावी, असे देखील उपमहापौर बाबर यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर बाबर यांनी नागरिकांना आवाहन केले की, भटक्या श्वानांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिकांनी ८७८८०७०६६५ या क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

या पाहणीप्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group