कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात अंडरवॉटर ड्रोन; १०० मीटर खोल पाण्यातही शोधकार्य शक्य
राज्यात जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर असा ड्रोन खरेदी करणारा कोल्हापूर पहिला जिल्हा; पाण्यात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांना होणार मदत

कोल्हापूर : पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता बचाव पथकांना थेट पाण्यात उतरून जोखीम घेण्याची गरज कमी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन दाखल झाला आहे. रिमोट कंट्रोलद्वारे चालणारा हा ड्रोन तब्बल १०० मीटर खोल पाण्यात जाऊन शोध घेऊ शकतो. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा ड्रोन खरेदी करणारे कोल्हापूर हे पहिले कार्यालय ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
या ड्रोनवर प्रखर क्षमतेचे दिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गढूळ पाण्यात आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही पाण्याखालील भागाची पाहणी करता येणार आहे. सलग एक तास काम करण्याची क्षमता, सुरक्षित दोरीच्या सहाय्याने नियंत्रण आणि पाण्याखालील वस्तूंची पाहणी करण्याची सुविधा ही या ड्रोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
१०० मीटर खोल पाण्यात शोधकार्य
कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी शंभरहून अधिक जणांचा बुडून मृत्यू होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अशा दुर्घटनांमध्ये बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे बचाव पथकांसमोरील मोठे आव्हान असते. नदी, धरण, तलाव आणि खोल पाणवठ्यांमध्ये शोध घेताना गढूळ पाणी, कमी दृश्यमानता आणि पाण्याची खोली यामुळे अडचणी निर्माण होतात.
आता अंडरवॉटर ड्रोनच्या मदतीने पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तू आणि परिसराची पाहणी करता येणार आहे. त्यामुळे शोधकार्यात लागणारा वेळ कमी होण्यास आणि बचाव पथकातील जवानांची जोखीम कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – भटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
आधुनिक तंत्रज्ञानामुळे बचावकार्यात मदत
आपत्ती व्यवस्थापन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोध आणि बचावकार्य अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या ड्रोनमुळे पाण्याखालील परिस्थितीची माहिती मिळवणे आणि शोधकार्याचे नियोजन करणे अधिक सोपे होऊ शकते.
याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध आणि बचावकार्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.




