परिणय फुके यांचा मुलाच्या अपघातावर खुलासा; म्हणाले, ‘यथार्थ गाडी चालवत नव्हता’
पेंच अभयारण्य परिसरातील अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याने कुटुंब शोकाकुल; हर्षवर्धन सपकाळांच्या आरोपांवर भाजप आमदारांचे प्रत्युत्तर, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

नागपूर : भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुलाच्या गाडीला झालेल्या अपघातावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या अपघातासंदर्भात ट्विट करत निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यावर आता परिणय फुके यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अपघाताच्या दिवशी आपला मुलगा यथार्थ गाडी चालवत नव्हता, असे त्यांनी सांगितले. तसेच, अपघातात यथार्थच्या लहानपणीच्या मित्राचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब दुःखात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळ पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते. अपघातग्रस्त वाहन भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीचे असल्याचा दावा करण्यात आला. अपघातावेळी फुके यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता. आमदाराचा मुलगा असला तरी कायद्यापासून संरक्षण मिळता कामा नये, अशी भूमिका घेत त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती.
‘यथार्थ गाडी चालवत नव्हता’; परिणय फुके यांचे स्पष्टीकरण
या आरोपांना उत्तर देताना परिणय फुके म्हणाले की, अपघाताच्या दिवशी यथार्थ वाहन चालवत नव्हता. अपघात झाला असता, तर यथार्थलाही गंभीर दुखापत झाली असती. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली.
या अपघातात यथार्थचा लहानपणीचा मित्र सिद्दिकी याचा मृत्यू झाला. तो त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे होता आणि लहानपणापासून त्यांच्या घरातच वाढला होता. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब दुःखात होते. त्यामुळे इतके दिवस या विषयावर कोणतेही वक्तव्य न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, समाजमाध्यमांवर होत असलेल्या आरोपांमुळे आता भूमिका मांडत असल्याचे फुके यांनी सांगितले.
हेही वाचा – भास्कर जाधवांच्या उदय सामंत भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम?
हर्षवर्धन सपकाळांचे आभार; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाचा उल्लेख
हर्षवर्धन सपकाळ यांनी यथार्थच्या अपघाताबाबत चिंता व्यक्त करणारे ट्विट केल्याबद्दल परिणय फुके यांनी त्यांचे आभार मानले. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्तही सपकाळ यांनी ट्विट केले असते, तर बरे झाले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली.
सपकाळ यांनी राहुल गांधी यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त करण्यास सांगितले असते, तर उद्धव ठाकरे यांची इज्जत वाचली असती, असेही फुके म्हणाले.
उद्धव ठाकरेंवरही टीका
यावेळी परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्यासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप त्यांनी केला. ओबीसींचे प्रश्न आपण सातत्याने मांडत असून, ओबीसी संघटनेतील पदाधिकारी भेटण्यासाठी आले होते. यावेळी आपला मुलगा यथार्थही उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.




