गोकुळ संघर्ष मोर्चावरून भाजपचा सतेज पाटलांवर पलटवार; ‘राजकीय दुकानदारी सुरू ठेवण्याचा डाव’
कोल्हापुरातील मोर्चानंतर आमदार प्रवीण दरेकर यांची पहिली प्रतिक्रिया; गोकुळच्या संचालक नियुक्तीवरून विरोधकांवर राजकारणाचा आरोप

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर चार तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते सहभागी झाले होते. या मोर्चातून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपनेही या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली असून, आमदार प्रवीण दरेकर यांनी सतेज पाटील यांच्यावर राजकीय हेतूने मोर्चा काढल्याचा आरोप केला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात साखर कारखानदारी उद्ध्वस्त झाली असती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नातून साखर कारखान्यांवरील कराचा प्रश्न मार्गी लागला आणि कारखान्यांना पुन्हा उभारी मिळाली. सतेज पाटील यांनी सहकार क्षेत्रातील आपल्या पूर्वीच्या सत्ताकाळाचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
“मोदी साहेबांनी सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले. तुम्ही सहकाराचा वापर ओरबाडण्यासाठी केला. तुमची संस्थाने उद्ध्वस्त होत आहेत, खालसा होत आहेत, म्हणून तुम्ही टीका करत आहात,” अशा शब्दांत दरेकर यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.
‘निर्णय प्रलंबित ठेवून राजकीय दुकानदारी सुरू ठेवण्याचा डाव’
गोकुळच्या संचालक नियुक्तीच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमी भूमिका घेतल्याचा दावा दरेकर यांनी केला. “एवढे राजकारण झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यास सांगितले. सरकारने हा पेच सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, निर्णय प्रलंबित राहावा आणि आपली राजकीय दुकानदारी सुरू राहावी, असा सतेज पाटील यांचा डाव होता,” असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा – दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीला लगाम! ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर दोन महिने बंदी
राहुल गांधींच्या भूमिकेवरही सवाल
संघर्ष मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले. “सरकार आपल्या बाजूने भूमिका मांडण्यासाठी वकील नेमत असते. मग गोकुळच्या विषयावर देशपातळीवर राजकारण का केले जात आहे? राहुल गांधी यांना यावर ट्वीट करण्याची गरज का पडली? त्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक लढवली आहे,” असे ते म्हणाले.
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालकांना कारभार करता यावा आणि सभासदांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागू नये, या उद्देशाने सरकारने निर्णय घेतल्याचा दावा दरेकर यांनी केला. मात्र, विरोधकांना या विषयाचे राजकारण करायचे असल्याने संघर्ष मोर्चा काढण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.
गोकुळ दूध संघातील संचालक नियुक्तीचा मुद्दा आता कोल्हापुरातील सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता राज्यातील राजकीय संघर्षाचा विषय बनला आहे. या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.




