दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीला लगाम! ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर दोन महिने बंदी
आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा आदेश; ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ पर्यंत निर्बंध लागू

मुंबई : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. हा प्रतिबंध ९ नोव्हेंबर २०२६ पासून ८ जानेवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
ठाणे, मुंबई आणि वसई-विरार परिसरात आगीच्या अनेक घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबईतही रॉकेट फटाक्यांवर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत परिपत्रक जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा नेमका आदेश काय?
ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत ११ ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या घटनांमध्ये सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही नागरिकांकडून हवेत उडणारे रॉकेट आणि तत्सम फटाके उडवले जात असल्याचे, तसेच काहीजण हातात रॉकेट धरून ते उडवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांचे जळते अवशेष निवासी इमारती, खिडक्या आणि ज्वलनशील वस्तूंवर पडल्यास आग लागण्याचा धोका असतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार, संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध असेल. सार्वजनिक आणि खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवार तसेच निवासी परिसरांमध्येही हे निर्बंध लागू राहतील.
हेही वाचा – संघावर बंदी आणण्याच्या प्रयत्नावेळी मुस्लिम व्यक्तीनेच केला होता बचाव; मोहन भागवत यांनी सांगितला ‘इब्राहिम’ यांचा किस्सा
९ नोव्हेंबर ते ८ जानेवारीपर्यंत बंदी
जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजून १ मिनिटापासून ते ८ जानेवारी २०२७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांनीही आपल्या सभासदांना या आदेशाची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ आणि ६० नुसार कारवाई केली जाणार आहे. इतर फटाक्यांचा वापर मात्र प्रचलित कायदे, सक्षम प्राधिकरणांचे आदेश आणि न्यायालयीन निर्देशांच्या अधीन राहूनच करता येणार आहे.
ठाण्यातील रहेजा कार्लाइन इमारतीला भीषण आग
नुकतीच वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन संकुलातील रहेजा कार्लाइन या १७ मजली इमारतीला भीषण आग लागली होती. रात्री साडेआठच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावरील एका घरात लागलेली आग काही वेळातच १४ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. या दुर्घटनेत इमारतीतील सुमारे ५० रहिवासी अडकले होते. ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य करत सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका केली.
वसई-विरारमध्ये २४ ठिकाणी आगीच्या घटना
दुसरीकडे, वसई-विरार शहरातही दिवाळीदरम्यान आगीच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. ८ नोव्हेंबरच्या सकाळपासून ९ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत शहरात तब्बल २४ ठिकाणी आगीच्या घटना घडल्याची माहिती आहे. गॅस सिलिंडर, निवासी इमारती, कारखाने, वाहने, लाकडाचे ढीग आणि कचऱ्याच्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या.
विशेष म्हणजे नालासोपारा-विरारदरम्यान भूमिगत रेल्वे केबलला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. परिणामी पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेलाही फटका बसला. या घटनांमध्ये दोघेजण किरकोळ भाजले, तर औद्योगिक परिसरात अडकलेल्या ३२ वर्षीय मनोज वर्मा यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.
आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने रॉकेट फटाक्यांवर घातलेली बंदी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.




