शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले तर आनंदच होईल; खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विधानाने राजकीय चर्चांना वेग
“कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेचीही एकत्रीकरणाची इच्छा”; एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चंद्रकांत रघुवंशी यांनीही व्यक्त केली होती अपेक्षा

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले तर आनंदच होईल, असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत आपली भूमिका मांडली. सध्या दोन्ही पक्षांचे नेतृत्व वेगवेगळे असल्याने एकत्र येण्याचा निर्णय दोन्ही पक्षांचे प्रमुखच घेऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
“शिवसेना एकत्र झाली तर आम्हाला आनंदच होईल. शिवसेना एकत्र आली तर चांगलेच आहे, असे सामान्य माणसांनाही वाटेल. कार्यकर्त्यांच्या भावनाही तशाच आहेत,” असे निंबाळकर म्हणाले.
पक्षांतराच्या निर्णयामागे परिस्थिती असल्याचे स्पष्टीकरण
ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता निंबाळकर यांनी त्या निर्णयामागील परिस्थितीचा उल्लेख केला. टीका होईल असा निर्णय कोणीही आनंदाने घेत नाही. परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आणि जनतेकडून वेगळा कौल मिळू लागल्यानंतर असा निर्णय घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमधील पराभवाचा संदर्भ देत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एकही पंचायत समिती किंवा नगरपालिका मिळू नये इतके पक्षाचे काम वाईट होते का, असा सवालही त्यांनी केला.
चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानाने चर्चेला सुरुवात
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही यापूर्वी व्यक्त केली होती. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर ती खरी दिवाळी ठरेल, असे विधान त्यांनी केले होते.
आता ओमराजे निंबाळकर यांनीही एकत्रीकरणाबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याने या चर्चेला आणखी वेग आला आहे. मात्र, दोन्ही गटांचे प्रमुख याबाबत काय भूमिका घेतात आणि प्रत्यक्षात काही राजकीय हालचाली होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




