TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळच्या वादात सरकार हस्तक्षेप करणार नाही; फडणवीसांची स्पष्ट भूमिका

हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सतेज पाटील यांनी एकत्र बसून तोडगा काढावा; वैधानिक पेच निर्माण झाल्यासच शासनाची भूमिका

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सतेज पाटील यांनी एकत्र बसून आपापसात निर्णय घेतला, तर सरकारला कोणालाही नामनिर्देशित करण्याची गरज पडणार नाही. त्यांनी परस्पर सहमतीने हा विषय सोडवला आणि वैधानिक पेच निर्माण झाला नाही, तर शासन कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

गोकुळवर कब्जा करण्याचा हेतू नाही

राज्य सरकारला गोकुळवर कब्जा करायचा आहे, ही भावना चुकीची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोकुळ ही सुमारे पाच हजारांहून अधिक मतदार असलेली आणि एका जिल्ह्यापुरती तसेच काही तालुक्यांपुरती मर्यादित संस्था आहे. अशा एका संस्थेसाठी सरकार आतुर असण्याचे कारण नाही. सरकारला कोणालाही तिथे पाठवण्यात रस नसून केवळ वैधानिक जबाबदारी पार पाडायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठका वारंवार कोरमअभावी तहकूब झाल्या असत्या, तर अधिकार आपोआप जिल्हा उपनिबंधकांकडे (DDR) गेले असते. त्यामुळे सरकारला संस्थेवर कब्जा करायचा असता, तर वेगळी प्रक्रिया करण्याची गरजच नव्हती, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

मंत्रिमंडळाचा निर्णय; कायदेशीर सल्ल्यानंतर प्रस्ताव

गोकुळबाबतचा निर्णय हा कोणत्याही एका पक्षाचा नसून शासन म्हणून मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वैधानिक पेचप्रसंगाची माहिती दिल्यानंतर हा प्रस्ताव पुढे आला. यासाठी महाधिवक्ता आणि कायदा व न्याय विभागाचा सल्ला घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि स्वतः फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तिघांच्या स्वाक्षरीने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे या निर्णयावर शिवसेनेची किंवा अन्य कोणाची नाराजी असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  वैभव चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या तपासाची मागणी; CID किंवा SIT चौकशी करा – मनोज जरांगे पाटील

कोरमचा पेच सोडवण्यासाठी नामनिर्देशनाचा पर्याय

१० तारखेला पुन्हा कोरम पूर्ण झाला नाही, तर कोरमशिवाय निवडणूक घ्यावी, असे न्यायालयाने सांगितलेले नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुन्हा होऊ शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले. गोकुळचे कायदे आणि उपविधींनुसार सलग तीन वेळा बैठक किंवा निवडणूक होऊ शकली नाही, तर अधिकार जिल्हा उपनिबंधकांकडे जातात आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात येतात, असा त्यांचा दावा आहे.

हा वैधानिक पेच टाळून कोरम पूर्ण व्हावा, यासाठी मतदानाचा अधिकार असलेल्या काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा पर्याय कायदेशीर प्रक्रियेतून आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोकुळच्या निवडणुकीला राजकीय रंग देऊ नये

गोकुळ ही चांगली संस्था असली, तरी तिच्या निवडणुकीचा राज्याच्या राजकारणावर काहीही परिणाम होत नाही. या विषयाला राजकीय रंग देणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी सतेज पाटील यांच्या उमेदवाराच्या कामगिरीवरही टिप्पणी केली. काँग्रेसकडून सहकारी संस्थेच्या निवडणुकीलाही राष्ट्रीय मुद्दा बनवले जात असल्याची टीका त्यांनी केली.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मत सतेज पाटील यांनी मांडलेल्या माहितीच्या आधारे तयार झाले होते, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्या मताच्या शेवटच्या परिच्छेदात समोर ठेवलेल्या माहितीच्या आधारेच निष्कर्ष दिल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. कोरम पूर्ण न झाल्याने निवडणूक घेता आली नाही आणि दोन्ही गटांकडे आवश्यक संख्याबळ नव्हते, ही वस्तुस्थिती त्या वेळी निदर्शनास आणून दिली गेली नव्हती, असेही ते म्हणाले.

गोकुळचा हा विषय न्यायालयात असून, राज्य सरकारची वैधानिक भूमिका योग्य आहे की नाही, याचा निर्णय न्यायालय घेईल. न्यायालयाच्या निर्णयाचा सरकार आदर करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group