‘राइज अँड फॉल २’ चा महाविजेता ठरला शहजाद पूनावाला; ३५ लाखांच्या बक्षिसासह पटकावली मानाची ट्रॉफी

Rise and Fall 2 | नाट्यमय घडामोडी, अनपेक्षित युती, राजकीय-सामाजिक डावपेच आणि सत्तांतराच्या थरारानंतर ‘राइज अँड फॉल’ (Rise & Fall) या लोकप्रिय एमएक्स ओरिजिनल रिॲलिटी शोच्या दुसऱ्या सीझनवर शहजाद पूनावाला याने आपले नाव कोरले आहे. ग्रँड फिनालेमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सर्व स्पर्धकांना मागे टाकत शहजादने अंतिम ‘रूलर’चा मान पटकावला असून, मानाच्या चषकासह ३५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आपल्या नावे केले. माजी धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने या सीझनचे दमदार सूत्रसंचालन केले होते.
१५ सेलिब्रिटी स्पर्धकांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये सुरुवातीला अंतिम ६ स्पर्धकांमध्ये चुरस होती. ‘फॉर्च्युन फ्लोअर पिरॅमिड’ या आव्हानामध्ये निहारिका तिवारी बाहेर पडली, तर त्यानंतर करण पटेल आणि स्वरा भास्कर यांचा प्रवास संपला. त्यामुळे प्रियांका चहर चौधरी, गौतम गुलाटी आणि शहजाद पूनावाला यांच्यात अंतिम तिहेरी लढत रंगली. विजेतेपदासाठी मतदान प्रक्रियेदरम्यान तिघांमध्ये मतांवरून पेच निर्माण झाला होता; अखेर उर्वरित स्पर्धकांच्या निर्णायक मतदानाच्या आधारे निकाल घोषित करण्यात आला. यात गौतम गुलाटी दुसरा उपविजेता, तर प्रियांका चहर चौधरी पहिली उपविजेती ठरली.
हेही वाचा
खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाई
“प्रतिकूलतेवर जिद्दीने केलेली मात”; विजेतेपदानंतर शहजाद भावूक
विजयानंतर बोलताना शहजाद पूनावाला म्हणाला, “हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. टॉवरमधील लक्झरी पेंटहाऊसपासून बेसमेंटमधील अनिश्चिततेपर्यंत अनेक चढ-उतारांचा मी सामना केला. परिस्थिती विरोधात असतानाही स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वभावावर ठाम विश्वास ठेवून मी पुढे गेलो. हे विजेतेपद म्हणजे जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभे राहिल्याचे प्रतीक आहे.”
बनिजय एशिया (Banijay Asia) आणि एंडेमोल शाइन इंडियाची निर्मिती असलेला हा रिॲलिटी शो प्राइम व्हिडिओ तसेच एमएक्स प्लेअरवर प्रेक्षकांसाठी मोफत उपलब्ध आहे.




